गुरुपौर्णिमेनिमित्त गीतेच्या 18 अध्यायांचे पठण

    09-Jul-2025
Total Views |
 
 dag
पुणे, 8 जुलै (आ.प्र.) :
 
श्रीमद्‌‍ भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचे सुस्वर पठण, गीतेची आरती, गीतामहात्म्य आणि मंत्रपठणाने संपूर्ण मंदिराचा परिसर भक्तिमय झाला. यावेळी भाविकांनी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या 128व्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित उत्सवात सामूहिक गीता पठणातून आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती घेतली. दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमा सप्ताहात गीता धर्म मंडळाच्या वतीने समग्र गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते.
 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम- जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त ॲड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सवप्रमुख महेंद्र पिसाळ, विश्वस्त सुनील रूकारी, राजेंद्र बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक आरास करून त्यातून समग्र संतदर्शन साकारण्यात आले होते. इंदूरच्या अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्या पुणे शाखेच्या वतीने तेजस तराणेकर यांच्या अधिपत्याखाली दत्तयाग झाला.
 
मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाईंच्या इच्छेनुसार दत्तमंदिरात दर एकादशीला सायंकाळी कीर्तन होते. आषाढी एकादशीनिमित्त शिवार्चनाताई कुलकर्णी यांचे संत जनाबाईंच्या जीवनचरित्रावर कीर्तन झाले. उत्सवानिमित्त नादब्रह्म गुरू तत्त्व रहस्य या विषयावर प्रवचनही झाले. यावेळी प्रवचनकार श्री गुरुदेव व्यास यांनी गुरू महात्म, गुरू संगती, परमात्म्याची ओळख, गुरूतत्त्व, नादब्रह्म यावर मार्गदर्शन केले.