देशात ‘स्पाेर्ट्स गेम’च्या नावाखाली क्रीडा क्षेत्रातील सट्टेबाजीचे व्यसन वेगाने वाढत आहे. हे व्यसन आहे, ही बाबच अनेक वेळा दुर्लक्षित राहते आणि याकडे गेम समजून गांभीर्याने पाहिले जात नाही. या व्यसनामुळे आर्थिक नुकसान, मानसिक ताण, नात्यांतील तणाव, कर्जबाजारी हाेणे आणि समाजात कमीपणा, हा प्रवास खात्रीने घडताे.श्रेया (नाव बदलले आहे) नावाची एक तरुणी, ‘मी 2022 ते 2024 या काळात क्रिकेट बेटिंगमध्ये तब्बल 8 काेटी रुपयांचे नुकसान करून घेतले. सुरुवातीला मी यूकेमध्ये शिकत असताना मजेसाठी हा ऑनलाइन सट्टा खेळू लागले. पण काही महिन्यांतच हा छंद व्यसनात बदलला. क्रिकेट सामन्यांवरच नव्हे, तर प्रत्येक बाॅलवर, खेळाडूंच्या कामगिरीवर बेटिंग सुरू झाले.खेळ, आनंद देणारा उरला नाही, तर ताे कर्ज, चिंता आणि सट्टा अॅपवर सतत खेळण्याचा माेह झाला.
’ सर्वांची कमाई बुडवून झाल्यावर कुटुंबातील वाद, कर्जे आणि शेवटी मानसिक तणावामुळे मुंबईतील एका पुनर्वसन केंद्रात दाखल झाली. श्रेयाला अनेक महिने उपचार घेतल्यावर या व्यसनातून सुटका मिळाली.मात्र, अशी कर्जातून आणि मानसिक आजारातून संधी प्रत्येकाला मिळतेच असे नाही.व्यसनाची मानसिकता : साधा इंटरफेस आणि सहज प्रवेशामुळे, अगदी मजुरी करणारे कामगारही या सट्टेबाजीत ओढले जात आहेत. एकदा का एखाद्याला थाेडा फायदा मिळाला, की त्याची जिंकण्याची हाव संपत नाही आणि ताे या व्यसनात गुरफटताे. काही लाेक महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये कमवत असले, तरी सट्ट्यासाठी उधारी घेतात आणि तीन लाखांपर्यंत बेटिंग करतात. हे अत्यंत धाेकादायक व्यसन सुरुवातीला क्रिकेटच्या मॅचसाठी सुरू हाेते, त्यानंतर प्रत्येक प्लेअर व बाॅलवर सट्टेबाजी करत फुटबाॅल, हाॅर्स रेसिंग आणि अन्य खेळांपर्यंत पाेहाेचते.
वयाच्या 20 ते 30 या गटातील तरुण विशेषतः या सापळ्यात अडकतात. बहुसंख्य लाेकांना हे व्यसन असल्याची जाणीवही नसते आणि यातून बाहेर पाडण्यासाठी व्यावसायिक मदतीची गरज आहे, हे कळतही नाही.प्रशासन आणि उपाय : माेठा आर्थिक फटका बसेपर्यंत, आपल्याला जुगाराचे हे व्यसन लागले आहे, तेच समजत नाही. एखाद्याचे उपचार करायचे झाल्यास पुनर्वसन केंद्रांची संख्या पुरेशी नाही. सध्या रिहॅब सेंटरचा खर्च सामान्यांसाठी परवडणारा नाही. एका सेशनला 4,000 रुपयांपर्यंत खर्च येताे आणि संपूर्ण ट्रीटमेंटसाठी 3.5 ते 6.5 लाखांचा खर्च हाेताे.‘समर्पण सारख्या संस्थेत मागच्या 3 वर्षांत, 40पेक्षा जास्त व्यसनी रुग्णांवर उपचार करण्यात आले. 20 ते 25 जणांना संस्थेमध्ये ठेवून उपचार करावा लागले. व्यसनाच्या या आजारासाठी काेणतीही औषधे नाहीत. समुपदेशनाच्या पद्धतीने उपचार हाेतात परंतु, त्या रुग्णांना इतर व्यसने असणाऱ्या रुग्णांबराेबरच ठेवावे लागते. देशात, अशा विशेष सेवा असलेली सरकारी केंद्रे नाहीत,’ साेनी सांगत हाेते.तज्ज्ञांच्या मते, या समस्येवर राष्ट्रीय पातळीवर समान कायदे करून उपाययाेजना करावी लागेल.
सध्या राज्यनिहाय कायदे वेगळे असल्यामुळे अंमलबजावणी करणे कठीण हाेते. सट्टा खेळणाऱ्यांची वय मर्यादा तपासणे, जाहिरातींवर नियंत्रण आणणे, सुरक्षा चाचणी करणे, अशा गाेष्टी लवकरात लवकर करणे अत्यावश्यक आहे. देशात बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी माेठ्या प्रमाणावर चालते. पारीमॅच, स्टेक, फेअरप्ले यासारख्या वेबसाइट्सवर माेठ्या प्रमाणावर (शेकडाे काेटी) ट्रॅफिक असताे. देशात सट्टेबाजीचे वार्षिक मूल्य 100 अब्ज डाॅलर इतके आहे आणि हे मुख्यतः परदेशी सर्व्हरवर चालणाऱ्या अॅपवरून हाेते. अनेक अॅपचे क्लाेन एकाच वेळी निर्माण हाेतात, त्यामुळे प्रशासनासाठी त्यांच्यावर कारवाई करणे कठीण जाते. हे सट्टा खेळवणारे प्लॅटफाॅर्म फक्त आर्थिक नुकसानच करत नाहीत, तर देशाच्या पिढ्यांना आणि सुरक्षिततेलाही धाेका निर्माण करतात.