पुणे, 4 जुलै (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रक्रिया केलेले सांडपाणी रेल्वेचे डबे, स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिका पुणे रेल्वेला दररोज दहा लाख लिटर पाणीपुरवठा करते. रेल्वेकडून या पाण्याचा वापर पिण्यासोबतच स्वच्छतेसाठीही मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महापालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाला हे आवाहन केले आहे. शहराची लोकसंख्या वाढत असून, पाण्याची मागणीही वाढत आहे. धरणातून पाणी उचलण्यासही मर्यादा असल्याने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून नदीपात्रात सोडले जाणारे पाणी उद्योगांना पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी पुरविण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीने सुरू आहे.
पुणे महापालिका मुंढवा जॅकवेल पंपिंग स्टेशनमधून शेतीसाठी साडेसहा हजार दशलक्ष घनफूट (टीएमसी) प्रक्रिया केलेले सांडपाणी पाणी शेतीसाठी पुरवते. याव्यतिरिक्त, प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी एक टक्केबांधकाम आणि बागकामासाठी टँकरद्वारे पुरवले जाते. हे जलसंवर्धन उपक्रम पुणे शहराला अधिक पर्यावरणपूरक बनवण्याच्या आणि शाश्वत पाण्याच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या प्रयत्नांचा अविभाज्य भाग आहेत. या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, पुणे रेल्वे विभागाजवळ असलेल्या नायडू एसटीपीमधील प्रक्रिया केलेल्या पाण्यचा पुनर्वापर करण्याचा विचार करावा, असे पुणे रेल्वे विभागाला दिलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे.
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षणीयरित्या कमी होईल. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे रेल्वेने या प्रस्तावावर विचार करावा आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबतच्या प्रस्तावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी; तसेच या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करून सविस्तर चर्चा करूया, असेही रेल्वेला पाठवलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. मात्र अद्यापपर्यंत रेल्वेने महापालिकेला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. याबाबतचा प्रस्ताव पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या सहीने दिलेला आहे. याबाबत पुणे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता, याबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल. मग त्यावर बोलणे योग्य होईल, असे त्यांनी सांगितले.
रेल्वे महिन्याला पाण्यासाठी मोजते 20 ते 25 लाख
पुणे महापालिकेकडून दिवसाला 10 लाख लिटर पिण्याचे पाणी पुरवते. हे पाणी रेल्वेतील टाक्या भरण्यासाठी वापरले जाते; तसेच रेल्वे प्लॅटफार्मवर पिण्यासाठी वापरले जाते. रेल्वेकडून रेल्वे डबे, स्वच्छतागृहे साफ करण्यासाठी देखील हे पिण्याचे पाणी वापरले जात असल्याची माहिती महापालिकेने दिली. रेल्वे पाण्यासाठी महिन्याला 20 ते 25 लाख रुपये मोजते.
शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचे विविध संस्थांना आवाहन केले जात आहे. एसटीपीचे पाणी वापरण्याचा विचार करण्याबाबतचे पत्र पुणे रेल्वे विभागाला देण्यात आले होते. मात्र या प्रस्तावावर रेल्वेने प्रतिसाद दिला आहे.
-मनीषा शेकटकर (उपायुक्त, विद्युत विभाग).