नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गाेरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आता ‘आफ्रिकन सफारी’ अनुभवता येणार आहे. गाेरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी विकसित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एफडीसीएम गाेरेवाडा झू लिमिटेड आणि नॅशनल बिल्डिंग कन्ट्रक्शन कार्पाेरेशन (एनबीसीसी इंडिया) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.विधानभवनातील समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात एनबीसीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के.पी. एम. स्वामी, कार्यकारी संचालक प्रवीण डाेईफाेडे आणि महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे, एफडीसीएमगाेरेवाडा झू लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखरन बाला यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आदी उपस्थित हाेते.गाेरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले हाेते. त्यानुसार आफ्रिकन सफारी आणि प्रवेशद्वारावर प्लाझा विकसित करण्यात येणारआहे. या प्रकल्पांतर्गत गाेरेवाडा प्राणी संग्रहालयातील सुमारे 63 हेक्टर जागेवर आफ्रिकन सफारी विकसित करण्यात येणार असून, सुमारे 22 आफ्रिकन प्रजातींचा समावेश असणार आहे. तसेच, प्रवेशद्वाराचेही काम करण्यात येणार आहे.सुमारे 285 काेटींचा हा प्रकल्प असून, ही कामे 18 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही आफ्रिकन सफारी पूर्णत्वास गेल्यानंतर नागपूर हे प्राणी संग्रहालय पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे.