मुंबई, 30 जुलै (आ.प्र.) :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाचे संचालक संतोष वॉरिक यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीतून अग्निशमन सेवेच्या कार्यपद्धतीपासून ते आपत्ती व्यवस्थापनातील योगदानापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर वॉरिक यांनी संवाद साधला आहे. ही मुलाखत गुरुवारी (31 जुलै) शुक्रवारी (1) व शनिवारी (2 ऑगस्ट) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर; तसेच न्यूज ऑन आयआर या मोबाइल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.
आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी, तत्काळ प्रतिसाद आणि पुनर्बांधणी ही तीन मूलभूत तत्त्वे केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभाग नैसर्गिक आपत्ती, आग, रस्ते अपघातांमध्ये नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अविरत कार्यरत आहे. आपत्कालीन परिस्थितीतील अग्निशमन सेवांची भूमिका, फायर सेफ्टी ड्रील्स, सुरक्षाविषयक जनजागृती; तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा महत्त्वाच्या विषयांवर या कार्यक्रमातून वॉरिक यांनी माहिती दिली आहे.