महावितरणकडून युद्धपातळीवर बिघाड दुरुस्त

31 Jul 2025 15:10:56
 
 mah
चाकण, 30 जुलै (आ.प्र.) :
 
महापारेषणच्या 220 केव्ही चाकण फेज-2 अतिउच्चदाब केंद्रातील 50 एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या चार दिवसांपासून चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांचा व परिसरातील गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरू होता. महावितरण व महापारेषणने युद्धपातळीवर काम करून मंगळवारी (29 जुलै) दुपारी 12.19 वाजता बिघाड दुरुस्त करत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले. चाकण फेज-2 अतिउच्चदाब वीज उपकेंद्रात महापारेषणची 50 एमव्हीए क्षमतेचे दोन अतिउच्चदाब रोहित्रे आहेत. त्यातील एकात 21 तारखेला बिघाड झाला.
 
चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना रविवारची सुटी असल्याने विजेची मागणी कमी असते. त्यामुळे 26 तारखेला दुपारी 4 वाजता नादुरुस्त रोहित्र बदल्याचे काम पारेषणने हाती घेतले. 28 तारखेला सकाळी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, सायंकाळी त्याच रोहित्रात पुन्हा बिघाड झाला. भर पावसात पुन्हा बिघाड दुरुस्ती करण्यात आली. शेवटी मंगळवारी दुपारी 12.19 वाजता उच्चदाब रोहित्र पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करण्यात यश आले. या काळात संबंधित रोहित्रावर असलेला 40 मेगावॉटचा भार दुसऱ्या रोहित्रावर वळवून चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा करण्यात आला. महावितरणने गावांना रात्री, तर उद्योगांना दिवसा चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा केला.
Powered By Sangraha 9.0