महावितरणचा बिझनेस टायटन्स पुरस्काराने सन्मान

30 Jul 2025 14:37:06
 
 mah
मुंबई, 29 जुलै (आ.प्र.) :
 
घरगुती ग्राहकांना सुमारे 25 वर्षे मोफत वीज उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणचा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स ॲवॉर्डने नुकताच फुकेत (थायलंड) येथे गौरव करण्यात आला. या सन्मानाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विकसित भारताचे उद्दिष्ट व भविष्यातील भकक्म अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या सुमारे 150 खासगी कंपन्या व सार्वजनिक उपक्रम कंपन्यांचे संचालक व प्रतिनिधींसाठी फुकेत येथे परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी यांच्या हस्ते महावितरणला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
महावितरणचे संचालक राजेंद्र पवार व विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. देशातील 1 कोटी घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली आहे. 75 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून स्वतःची वीजनिर्मिती करण्यासाठी निवासी कुटुंबांना सक्षम करण्यात येत आहे. अपर मुख्य सचिव आभा शुक्ला व लोकेश चंद्र यांच्या नेतृत्वात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. राज्यात आतापर्यंत 2 लाख 42 हजार 714 घरगुती ग्राहकांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून, त्याची क्षमता 919 मेगावॉट आहे. या योजनेत सहभागी ग्राहकांना आतापर्यंत 1685 कोटी 42 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या या उल्लेखनीय राष्ट्रीय कामगिरीची दखल घेत महावितरणचा गौरव करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0