
राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण व सक्षमीकरणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धाेरण आहे.यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. राहुरी बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपाहारगृहाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे लाेकार्पण करताना पवार बाेलत हाेते. आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार लहू कानडे, कैलास पाटील, डाॅ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक केरू पानसरे, बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे आदी मान्यवर उपस्थित हाेते. केंद्र सरकारने पुणे-अहिल्यानगर नवीन रेल्वे मार्गास मंजुरी दिली आहे. भूसंपादन प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार असून, त्यांना याेग्य माेबदला देण्यात येईल. या मार्गामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ हाेणार आहे. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी सुसज्ज टर्मिनलसाठीही मंजुरी मिळालेली असून, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांद्वारे देश-विदेशांतील भाविक शिर्डीत येऊ शकणार आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचे पवार यांनी सांगितले.