इन्फाेसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती हे केवळ यशस्वी उद्याेजकच नाही, तर एक नम्र, मूल्यप्रधान आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. यश मिळवण्यासाठी काय करायला हवे, त्यासाठी काेणती मूल्ये पाळायला हवीत, हे त्यांनी आपल्या वर्तनातून आणि भाषणातून सतत दाखवून दिले आहे. यश मिळवण्यावरील त्यांनी अनेकदा आपल्या विचारांची मांडणी केली आहे.नारायण मूर्ती यांच्या मते, काेणत्याही व्यवसायात किंवा आयुष्यात प्रामाणिकपणा हे सर्वात माेठे भांडवल असते. यशासाठी शाॅर्टकटची वाट न शाेधता, नियमित अभ्यास, सातत्य आणि कठाेर श्रमावर भर द्या. नम्रपणा आणि एकत्रित प्रयत्नातून यश प्राप्त हाेते. त्यामुळे यशाचे श्रेय स्वतः कडे न घेता आपल्या टीमला द्या.
ज्ञान आणि शिक्षणावर विश्वास ठेवा.आयुष्यात काेणत्याही टप्प्यावर शिक्षण थांबवू नका. शिक्षण थांबविले तर नव्या काळात काय घडते याचा आदमास येत नाही.त्यांच्या मते, यशस्वी हाेणे म्हणजे केवळ स्वतःसाठी संपत्ती निर्माण करणे नव्हे, तर समाजासाठी काही देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.काेणतेही माेठे यश मिळवण्यासाठी अपयशाची भीती न ठेवता आत्मविश्वासाने पुढे जावे लागते.
त्यामुळे धाडस करण्यास घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत पुढे जात राहा. संकटांमध्ये संधी शाेधा हा त्यांचा सल्ला सर्वांसाठी फार माेलाचा आहे.नारायण मूर्ती यांचे आयुष्य हेच संकटांवर मात करून संधी ओळखण्याचे प्रतीक आहे.
त्यांनी अनेक अडचणींना सामाेरे जाऊन स्वतःचे स्वप्न साकार केले. त्यांचे आयुष्य म्हणजेच संकटांवर मात करून यश मिळवण्याचे उदाहरण आहे हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.नारायण मूर्ती यांची यशावरील मांडणी ही आधुनिक भारताच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी सत्य, मेहनत, शिक्षण, नम्रता आणि सामाजिक उत्तरदायित्व या पायाभूत मूल्यांच्या जाेरावर एक जागतिक दर्जाची कंपनी उभी केली. यश हे केवळ संपत्ती नाही, तर लाेकांच्या मनात स्थान मिळवणे, असे ते मानतात.आजच्या स्पर्धेच्या युगात जर काेणाला यशस्वी व्हायचे असेल, तर नारायण मूर्ती यांचे विचार हे दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात.