मुख्यमंत्री फेलाेशिप कार्यक्रमात सहभागी युवकांना सार्वजनिक धाेरण (पब्लिक पाॅलिसी) प्रमाणपत्र अभ्यासक्रम देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या नियाेजन विभागाने भारतीय प्राैद्याेगिक संस्थेशी (आयआयटी) मुंबई सामंजस्य करार केला. आयआयटीबराेबरच्या या अभ्यासक्रमामुळे फेलाेशिप कार्यक्रमातील तरुणांच्या क्षमतांत वाढ हाेणार असून, त्यांना अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.यावेळी नियाेजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगाेपाल देवरा व आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक कृष्णा फिरके, सहसचिव चारुशीला चाैधरी, मुख्य संशाेधन अधिकारी निशा पाटील, उपसंचालक दीपाली धावरे, आयआयटीचे उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे, अधिष्ठाता प्रा. उषा अनंतकुमार, प्रा.विनिश कठुरिया, प्रा. परमेश्वर उदमले आदी उपस्थित हाेते.मुख्यमंत्री फेलाेशिप कार्यक्रमात युवकांसाठी या वर्षीपासून जिल्हास्तरावर फेलाेशिप कार्यक्रम राबवण्यात येत असून, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबराेबर क्षेत्रीय स्तरावर काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.सार्वजनिक विकासाचे प्रश्न समजण्यासाठी व ते साेडवण्यासाठी आवश्यक साधने व शास्त्राचे ज्ञान देण्याचा या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उद्देश असल्याचे देवरे यांनी सांगितले.