पुणे, 1 जुलै (आ.प्र.) :
शाळा भरल्याची घंटा... वर्गात जाण्याची लगबग... नैमित्तिक प्रार्थना... एकसाथ नमस्त्े... असे म्हणत शिक्षकांना केलेले अभिवादन, विद्यार्थिनी व शिक्षिकांच्या हस्ते झालेले सामूहिक दीपप्रज्वलन... अशा भारावलेल्या वातावरणात सुमारे 50 वर्षांनंतर प्रसिद्ध हुजूरपागा शाळेतील शंभरपेक्षा जास्त विद्यार्थिनींनी अनुभवला इयत्ता दहावीचा वर्ग! 1975 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी विनिता पिंपळखरे, हेमलता देशपांडे, विभावरी ठकार, संध्या देशपांडे, मीना साने यांच्या पुढाकारातून आज (दि. 29) हुजूरपागा शाळेतील अमृत महोत्सव सभागृहात सुवर्ण महोत्सवी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यातील नारायण पेठेत असलेली हुजूरपागा ही शाळा स्वातंत्र्यपूर्व भारतातील फक्त मुलींसाठी असलेली दुसरी शाळा आहे. 11वी मॅट्रिक परीक्षा पद्धती बंद झाल्यानंतर 1975 मध्ये एसएससी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पहिल्या बॅचचा स्नेहमिलन सोहळा होता. 1975च्या दहावीच्या बॅचला शिकविणाऱ्या डॉ. अपर्णा जोशी, सुलभा गोरे, जयश्री बापट, उमा वाळिंबे या ज्येष्ठ शिक्षिकांची विशेष उपस्थिती होती. विद्यार्थिनींनी केलेले विविध गुणदर्शन पाहून जणू आपण स्नेहसंमेलन अनुभवतो आहे, असा अनुभव प्रत्येकास आला. भारती जोग, मंजूषा दाते, मोहिनी अत्रे, रसिका एकबोटे यांनी चित्रपट, भावगीतांसह नाट्यगीते सादर केली.
जयंत साने (संवादिनी), दीपक उपाध्ये (तबला) यांनी साथसंगत केली. सीमा शुल्क विभागातून निवृत्त झालेल्या मीना साने-करमकर; तसेच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या हेमलता देशपांडे यांनी आपआपल्या क्षेत्रातील अनुभव कथन केले. तुमची एसएससीची पहिली बॅच आम्हालाही हुरहूर लावणारी होती, असे सांगून जयश्री गोरे म्हणाल्या, ‘1975 सालच्या दहावीच्या परीक्षेत आम्ही नव्या शिक्षकांवर टाकलेला विश्वास तुम्ही विद्यार्थिनींनी सार्थ ठरवत हुजूरपागेच्या लौकिकात भरच घातली. तुम्हा विद्यार्थिनींचा हा विजय आम्हा शिक्षकांचाही विजय ठरला.’ कल्याणी केतकर, सुरेखा अण्णेगिरी यांनी शिक्षकांचा परिचय करून दिला. विनिता पिंपळखरे यांनी सूत्रसंचालन केले.