भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ई- काॅमर्स आणि क्विक-काॅमर्स प्लॅटफाॅर्मसना अन्न सुरक्षा व स्वच्छतेसंबंधी नियम माेडल्याबद्दल कठाेर कारवाईचा इशारा दिला आहे. या अंमलबजावणीसाठी, ई-काॅमर्स कंपन्यांना त्यांच्या गाेदामांचा तपशील, अन्न हाताळणारे कर्मचारी व इतर संबंधित माहिती एफएसएसएआयला देणे बंधनकारक केले आहे, जेणेकरून अधिक पारदर्शकता व सुरक्षितता निश्चित करता येईल. हा निर्णय काही राज्य सरकारांनी क्विक काॅमर्स प्लॅटफाॅर्मवर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन समाेर आले हाेते, ज्या कारणासाठी कारवाई करण्यात आली. या बैठकीत 70 हून अधिक ई-काॅमर्स व क्यू-काॅमर्स कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले हाेते.एफएसएसएआयच्या सीईओ, जी कमला वर्धाना राव यांनी स्पष्ट केले की, ‘खाद्य सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अन्न सुरक्षेसंबंधी नियमांचे पालन न केल्यास गंभीर कारवाई हाेणार आहे.
काेणत्याही प्लॅटफाॅर्मने त्यांच्या लायसन्स किंवा नाेंदणी क्रमांकाची माहिती प्रत्येक बिल, इनव्हाॅईस किंवा राेख पावतीवर स्पष्टपणे द्यावी, जेणेकरून ग्राहकांना खरी माहिती मिळेल.एफएसएसएआयने ई-काॅमर्स कंपन्यांना पुढील सूचना दिल्या - अधिकृत पाेर्टलवर सर्व गाेदामे व साठवणूक केलेल्या केंद्रांची माहिती अपलाेड करावी.स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांची सक्तीने अंमलबजावणी करावी. अन्न हाताळणारे सर्व कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना प्राधिकरणाचे प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे. राव यांनी स्पष्ट केले की, ‘अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधिकरणाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. ई-काॅमर्स कंपन्यांना त्यांच्या प्रशिक्षण याेजनेचे वेळापत्रक एफएसएसएआयकडे सादर करावे लागेल. त्यांच्या गाेदामांची नियमित छायाचित्रे पाेर्टलवर अपलाेड करावी लागतील.’ प्राधिकरणाने स्पष्ट केले, की उत्पादनापासून ते ग्राहकापर्यंत पाेहाेचवणाऱ्या पूर्ण पुरवठा साखळीतील प्रत्येक घटक कायद्याच्या कक्षेत येताे व प्रत्येकजण दर्जेदार पुरवठा करण्यास जबाबदार आहे.