दावाेसमधील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यात देशात महाराष्ट्र पहिले राज्य आहे. यावर्षी दावाेसमध्ये 15 लाख 74 हजार काेटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या उद्याेगस्नेही वातावरणामुळे राज्यात मुख्यमंत्री राेजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत मागील 3 वर्षात 62 हजार नव उद्याेजक निर्माण झाले आहेत. देशात प्रथमच उद्याेग क्षेत्रावर श्वेतपत्रिका राज्यात काढण्यात आली आहे. उद्याेग क्षेत्राच्या समताेल विकासासाठी राज्य शासन काम करत आहे, असे उद्याेग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. उद्याेजकांना गुंतवणुकीस प्राेत्साहनासाठी जिल्हा उद्याेग परिषद उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून यावर्षी 1 लाख काेटींवर गुंतवणूक झाली आहे. गेली तीन वर्षे सातत्याने राज्यात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढताे आहे, असे सामंत यांनी सांगितले. राज्यात मागणीनुसार आवश्यकतेप्रमाणे औद्याेगिक वसाहती स्थापन करण्यासाठी हजाराे एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात नवीन औद्याेगिक वसाहती सुरू करण्यात येतील. उद्याेजकांना ताकद व उद्याेगांच्या विकासासाठी राज्य शासन तत्पर आहे, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.