नागपूरमधील विधानभवनाच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे व्हावे, असे विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले आदी उपस्थित हाेते. वास्तुविशारद हाफिज काॅन्ट्रॅक्टर यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.
नागपूरमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या जागेवर नवीन सात मजल्यांचे संकुल उभारण्यात ेणार असून, हे विस्तारीकरण करताना सध्याच्या इमारतीची ऐतिहासिक शैली अबाधित राहील याची काळजी घेण्यात येणार आहे. विस्तारीकरणात एकाच इमारतीत सेंट्रल हाॅल, विधानसभा, विधान परिषद सभागृह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, विराेधी पक्षनेत्यांचे दालन आदी असणार आहेत.शेजारीच मंत्रिमंडळ सदस्यांसाठी वेगळी सहा मजल्यांची इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच, वाहनतळ, उपाहारगृह, अभ्यागत कक्ष, सुरक्षा कक्ष आदी सुविधा असणार आहेत.
शासकीय मुद्रणालयाची जागा विधिमंडळास मिळाली असून, या जागेवर मंत्रालयीन प्रशासकीय कार्यालयांसाठी चार लाख चाै. फुटांची चाैदा मजली भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. विधानभवन परिसर व प्रस्तावित प्रशासकीय इमारतीस भुयारी टनेलने जाेडण्यात येणार आहे.नागपूरमधील विधानभवनाच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीचे काम महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. महामंडळाने यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अॅड. नार्वेकर यांनी दिले. विधानभवनाचे विस्तारीकरण व नवीन इमारत बांधताना हरित इमारतीची संकल्पना राबवण्यात यावी. विधानभवनाच्या विस्तारीकरणात अभ्यांगतांसाठी पुरेशी जागा, तसेच उपाहारगृहाची साेय असावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.