पाेट साफ न हाेण्याचा तुमच्या हृदयावरही परिणाम हाेताे

17 Jul 2025 13:48:20
 

heart
दीर्घकालीन बद्धकाेष्ठता ही केवळ तुमच्या पचनसंस्थेवरच परिणाम करते असे नाही, तर ती हृदयावरही दबाव आणू शकते. हे विशेषतः वयाेवृद्धांमध्ये किंवा आधीच हृदयराेग असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून येऊ शकते.म्हणूनच, काेणताही विलंब न करता बद्धकाेष्ठतेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सध्या, माेठ्या संख्येने लाेक बद्धकाेष्ठतेचा त्रास सहन करतात.हे खूपच चिंताजनक आणि लाजिरवाणे असू शकते. बद्धकाेष्ठतेची लक्षणे म्हणजे आठवड्यातून तीनपेक्षा कमी मलविसर्जन करणे, कडक, काेरडे मल, मल विसर्जनास त्रास हाेणे किंवा वेदना हाेणे, पाेट पूर्णपणे रिकामे झाल्यासारखे न वाटणे आणि पाेट फुगणे किंवा अस्वस्थता जाणवणे.
बद्धकाेष्ठतेच्या कारणांमध्ये म्हणजे फायबरयुक्त आहाराचे प्रमाणकमी असणे, पाणी कमी पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव, काही औषधे (जसे की वेदनाशामक किंवा अँटीडिप्रेसेंट्स), वेळीच मलविसर्जन न करणे आणि थायराॅईड समस्या, मधुमेह किंवा इरिटेबल बाेवेल सिंड्राेम (खइड) यांचा समावेश आहे.मुंबईतील अपाेलाे स्पेक्ट्रा हॅास्पिटलचे जनरल सर्जन डाॅ. लक्ष्मण साळवे सांगतात की, लाेकांना बद्धकाेष्ठतेबद्दल चर्चा करण्यास अनेकदा लाज वाटते.या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर परिणाम हाेऊ शकतात, ज्यामध्ये आतड्यांचे नुकसान, मूळव्याध आणि हृदयाचा धाेका वाढणे यांचा समावेश आहे. आतड्यांचे आराेग्य आणि हृदयाचे आराेग्य यांचा जवळचा संबंध आहे.बद्धकाेष्ठता ही अनेकदा किरकाेळ पचन समस्या म्हणून नाकारली जाते.
परंतु ती हृदयाच्या आराेग्यावर परिणाम करू शकते. आतड्यांवर सतत ताण आल्याने रक्तदाबात तात्पुरती पण धाेकादायक वाढ हाेऊ शकते.हृदयराेगाचा वैद्यकीय इतिहास असलेल्या लाेकांसाठी, यामुळे छातीत दुखणे, एरिथमिया किंवा क्वचित प्रसंगी हृदयविकाराचा झटका येऊ शकताे.बद्धकाेष्ठतेकडे कधीही दुर्लक्ष करू नये, विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये किंवा हृदयराेग असलेल्यांमध्ये ही समस्या गंभीर रूप धारण करू शकते.शाैचास ताण देण्याच्या कृतीमुळे छातीवरील दाब वाढताे आणि हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी हाेताे, ज्यामुळे हे चिंतेचे कारण ठरू शकते. डाॅ. साळवे पुढे सांगतात, की दरराेज किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या, फळे, भाज्या आणि तृणधान्यांना राेजच्या आहारात समावेश करा. उच्च फायबरयुक्त पदार्थ खा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा. मल राेखून ठेवणे टाळा.
 
Powered By Sangraha 9.0