राज्याच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टाेरेज) क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाने उदंचन जलविद्युत प्रकल्पांसंदर्भात महत्त्वाचे चार सामंजस्य करार केले. या करारांमुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्याेगिक व सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र हे पंप स्टाेरेज प्रकल्पात देशात अग्रणी राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गाेदावरी व कृष्णा खाेरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व काेकण विकास महामंडळ) गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री डाॅ. अशाेक वुईके, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खाेरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपाेले आदी उपस्थित हाेते.
साैरऊर्जा आणि पंप स्टाेरेजद्वारे वीजनिर्मितीवर भर देण्यात येत आहे.ग्रीडची स्थिरता राखण्यासाठी पंप स्टाेरेज प्रणाली उपयुक्त ठरणार असून, राज्यात साैरऊर्जेत माेठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू झाली आहे. त्याशिवाय इतर पर्यायी वीजनिर्मितीच्या क्षेत्रातही काम सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.जलसंपदा विभागाने एक लाख मेगावाॅट क्षमतेच्या पंप स्टाेरेज प्रकल्पांचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवले असून, विविध उद्याेगसमूहांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता हे उद्दिष्ट साध्य हाेण्याची शक्यता असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.