अ फ्यू गुड मेन हा राॅब रायनर दिग्दर्शित मिलिटिरी काेर्टरूम ड्रामा. त्यात जॅक निकाेलसन, टाॅम क्रूझ, डेमी मूर, केविन बेकन, क्युबा गुडिंग ज्युनियर असे नामांकित कलाकार आहेत. एका बेटावरच्या नाैदलाच्या तुकडीमध्ये एका नाैसैनिकाचा खून त्याच्याच सहकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून केला आहे, याबद्दलचा खटला सुरू आहे. वकील कॅफी (टाॅम क्रूझ) लष्करी काेर्टात कर्नल जेसपची (जॅक निकाेलसन) उलट तपासणी घेताे आहे, असा प्रसंग सिनेमाचा कळसाध्याय आहे.सैन्यदलांमध्ये बेकायदा चालवला जाणारा काेड रेड नावाचा प्रकार (म्हणजे आपल्याच एखाद्या सैनिकाचा खून करणं) आपण केला, याची कबुली देण्याच्या आधी जेसपचं एक स्वगत आहे.
आम्ही तिकडे सीमेवर सजग असताे म्हणून तुम्ही इकडे सुखाने जगू शकता, असा त्याचा गाभा. हा प्रसंग चित्रित करताना राॅबने जॅकला विचारलं, तुझं स्वगत आधी चित्रित करू की त्यावरच्या इतर कलाकारांच्या रिअॅक्शन आधी घेऊ.जॅक म्हणाला, आधी रिअॅक्शन्स घे. त्या प्रत्येक शाॅटला जॅकने ते स्वगत अप्रतिम सादर केलं. राॅब म्हणाला, तू त्यांच्याच शाॅटला हे इतक्या ताकदीने सादर करताे आहेस, तर तुझा शाॅट असेल तेव्हा ही एनर्जी राहील का? त्यावर जॅक म्हणाला, राॅब, मला अभिनय करायला फार आवडताे. मी ताे कितीही वेळा करू शकताे.