तणावामुळे मुलांचे मानसिक आराेग्य ढासळतेय

16 Jul 2025 14:27:09
 
 

Strees 
 
गेल्या काही वर्षांत विशेषतः काेविडपूर्व काळापासून किशाेरवयीन (टिनएजर्स) मुलांमध्ये चिंता आणि मानसिक अस्वस्थता वाढत असल्याचे दिसून येते. महामारीनंतर ही स्थिती आणखीच गंभीर झाली आहे. यात वाढच झाली कारण मुलांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत आहे. शिक्षण, करिअर आणि हवामान बदल यासारख्या अनेक गाेष्टींमुळे त्यांची असुरक्षितता वाढत आहे.आजच्या मुलांना पूर्वीच्या तुलनेत, खेळण्यात किंवा निवांतपणा घालवायला फारच कमी वेळ मिळताे. शाळा-काॅलेजचा मधला सुट्टीचा वेळ हा देखील माेकळा न राहता शिक्षणाच्या किंवा इतर कामासाठी वापरला जाताे. सतत हाेणाऱ्या परीक्षा, त्याचा अभ्यासाचा दबाव आणि रिझल्टच्या मार्कांवर अनावश्यक भर, या सर्व ताणतणावामुळे ‘शिक्षण’ कमी आणि ‘स्पर्धा’ जास्त, असा प्रकार हाेत आहे. अनेक वेळा, शाळा संपल्यानंतर मुले सरळ क्लासला जातात.
 
त्यांचे राेजचे वेळापत्रक इतके भरलेले असते, की मैदानी खेळ खेळण्यासाठी, मित्रांबराेबर निवांत वेळ घालवणे किंवा साधा संवाद साधणेही त्यांना जमत नाही. त्यातच स्मार्टफाेन, साेशल मीडिया आणि एकलकाेंडी जीवनशैली, यामुळे प्रत्यक्ष भेटीऐवजी ‘ऑनलाइन’ संवादातच समाधान मानावे लागत आहे.तंत्रज्ञान आणि तणाव : प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जाेनाथन हाड्ट यांनी म्हटले आहे की, मुलांमध्ये वाढणारी चिंता ही मुख्यत्वेकरून स्मार्टफाेनच्या वापरामुळे आहे.त्यांच्या बालवयातील माेकळेपणाने खेळणे बंदझाले आहे. सतत ऑनलाइन राहणे, झाेपेचा अभाव आणि एकटे राहण्याने त्यांचे मेंदू वेगळ्या पद्धतीने ‘रिवायर’ हाेत आहेत. मुलांना प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव देण्यास पालक कमी पडत आहेत, त्यामुळे तणाव, अस्वस्थता वाढताना दिसत आहे. पालकांनी कुटुंबासाठी केलेले नियम त्यांना मान्य करायचे नाहीत. कुटुंब व्यवस्था सुरू आहे, ती तंत्रज्ञानाच्या उपकरणांच्या भाेवती.
 
वाचनाची सवय : ब्रिटिश लेखक सॅम लीथ यांनी आपल्या लेखनात सांगितले, की वाचनाची लहान वयात गाेडी लागली, की ही आयुष्यभराची सवय बनते. लहानपणीचे गाेष्टींचे वाचन हे केवळ शब्द ओळखण्यापुरती नसते, तर ती कथा कशी साकारत जाते, लेखनशैली काय असते, विचार कसे मांडले जातात, या सगळ्याचा मुलांच्या मनावर खाेल परिणाम हाेताे. वाचनामुळे फक्त कल्पनाशक्तीच वाढत नाही, तर त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचाही विकास हाेताे. याचाच पुढचा टप्पा लहान मुलांसाठी चित्रकथांच्या पुस्तकांमधून या सवयी जडतात, स्मार्टफाेन सारखी उपकरणे मागे पडतात.
 
भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे : अल्बर्ट आइनस्टाइन म्हणाले हाेते, तुम्हाला तुमच्या मुलांना बुद्धिमान बनवायचे असेल, तर त्यांना परीकथा वाचून दाखवा व वाचायला लावा.जितक्या जास्त कथा ते वाचतील त्यांची कल्पनाशक्ती वाढेल, त्यांना भावनिक बुद्धिमत्तेचा खजिना मिळेल - त्या गाेष्टींमधून मुलांना प्रामाणिकपणा, करुणा, धैर्य, त्याग आणि नीतिमत्ता काय असते ते समजेल. ‘किंग लिअर’मध्ये मुलीच्या नि:स्वार्थ प्रेमाचे चित्रण असाे किंवा ‘द लिट्ल प्रिन्स’मधून मानवी संबंधांचं भावविश्व, हे सगळे वाचनातूनच मुलांना समजू शकते. पुस्तकांची उपलब्धी ही स्वस्त आणि सहज असेल, तर जास्तीत जास्त संख्येने लहान मुलांपर्यंत पाेहाेचता येते, त्यांचा भावनिक आणि बाैद्धिक, दाेन्ही स्तर वाढवता येताे.पुस्तके परवडणारी असावीत : संध्या राव आणि शायलेजा मेनन यांची पुस्तके भारतातल्या मुलांच्या मनाचा वेध घेततात. यात राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या उपक्रमांतर्गत भारतीय कलाकारांकडून साकारलेल्या चित्रकथांचा समावेश आहे. परंतु ही पुस्तके सगळ्यांपर्यंत पाेहाेचतातच असे नाही. ही पुस्तके ग्रामीण भागात, सार्वजनिक वाचनालयांत सहज उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. पुस्तकेच जर मुलांपर्यंत पाेहाेचली नाहीत तर त्या लेखनाचा नव्या पिढ्यांना उपयाेगच हाेणार नाही.
Powered By Sangraha 9.0