यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पातील एक बाेगदा देशातील सर्वांत लांब बाेगदा असून, या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी हाेणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार बाळा भेगडे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पुणे विभागीय आयु्नत डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, काेकण विभागीय आयु्नत विजय सूर्यवंशी, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भाेसले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सहव्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल, राजेश पाटील, मुख्यअभियंता राजेश निघाेट, अधीक्षक अभियंता राहुल वसईकर उपस्थित हाेते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘मुंबई- पुणे या महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर कमी हाेणार असल्याने प्रवाशांना याचा फायदा हाेणार आहे. महामार्गावरील घाट असलेला भाग या प्रकल्पामुळे टाळता येणार असून, घाटमार्गामुळे हाेणारा वाहतूक अडथळा दूर हाेणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या महामार्गावर आरामदायी प्रवास हाेणार आहे.’ मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत एकूण तीन बाेगदे असून, एक बाेगदा 9 किलाेमीटर लांब व 23 मीटर रुंद असून, देशातल्या सर्वांत जास्त लांबीचा बाेगदा ठरणार आहे. याअगाेदर समृद्धी महामार्गावरील बाेगद्याचा विक्रम या बाेगद्यामुळे मागे पडेल. प्रकल्पांतर्गत अतिशय उंच पूल बांधण्यात येत असून, याची उंची 185 मीटर आहे. देशामध्ये आत्तापर्यंत एवढा उंच पूल कुठल्याच ठिकाणी बांधला गेला नाही. हादेखील एक विक्रम हाेणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने या प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे.
या प्रकल्पाचे एकूण 94 ट्नके काम ूर्ण करण्यात आले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत प्रकल्पाचे काम करणारे अभियंते आणि कामगारांचे काैतुक केले.उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मिसिंग लिंक प्रकल्प हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत असून, हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. येथील वातावरण व हवेच्या दाबाची स्थिती पाहता अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अनेक अभियंते येथे काम करीत आहेत. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अर्ध्या तासाने कमी हाेणार असून, या घाट भागातील वाहतुकीची समस्या पूर्णपणे सुटण्यास आणि अपघात टाळण्यास मदत हाेणार आहे. महामार्गावरील या प्रकल्पामुळे वेळेसाेबतच इंधनाचीही बचत हाेईल, प्रदूषणही कमी हाेईल. देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार असून, सर्वसामान्य नागरिकांना व राज्यातल्या जनतेला हा प्रकल्प दिलासादायक ठरेल.’ यावेळी व्यवस्थापकीय संचालक गायकवाड यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.