12 किल्ल्यांना जागतिक वारसा मानांकन

    14-Jul-2025
Total Views |
 
 

fort 
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधाेरेखित झाला आहे. राज्यातील 11 आणि तमिळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांना युनेस्काेचे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे.हा संपूर्ण राज्यासाठी अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे.या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत असलेल्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला हाेता. त्यात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लाेहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी (महाराष्ट्र) आणि जिंजी (तमिळनाडू) या किल्ल्यांचा समावेश हाेता. युनेस्काेच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषांवर हे किल्ले खरे उतरले.शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी मानांकनाच्या निर्णयात निर्णायक ठरल्या.
 
या मानांकनासाठी अनेक शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे काम केले.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयामार्फत 2024-25 या वर्षासाठी निवडलेल्या 5 प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा मराठा लष्करी स्थापत्य हा प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयाने युनेस्काेकडे पाठवण्यासाठी निवडला हाेता. या यशस्वी प्रवासात वास्तुविशारद डाॅ.शिखा जैन आणि पुरातत्त्व संचालक डाॅ. तेजस गर्गे यांचे याेगदान माेलाचे ठरले. युनेस्काेच्या 46व्या अधिवेशनात राज्यातील अधिकारी, गडसंवर्धन समिती सदस्य व तज्ज्ञांचा सहभाग हाेता.सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी युनेस्काेच्या महानिदेशकांची भेट घेऊन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्काेतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि पुरातत्त्व संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी यांच्या प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले.