मृत व्य्नतीच्या नावावर कर्ज; कुटुंबाचा कंपनीवर फसवणुकीचा आराेप’

    14-Jul-2025
Total Views |
 

dead 
 
कतारमध्ये राहणारे एनआरआय (अनिवासी भारतीय) अयाझ पारकर यांनी दावा केला आहे, की वडिलांच्या मृत्यूनंतर, त्यांच्याच नावावर 13 लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. आयसीआयसीआय बँकेशी संलग्न, कर्ज देणाऱ्या ‘एसबीएफसी’ संस्थेने बनावट कागदपत्रांच्या आधारे ही फसवणूक केली, असे पारकर यांनी आरबीआयकडे केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे.पारकर यांच्या म्हणण्यानुसार, ‘केवायसी किंवा काेणतीही प्रत्यक्ष तपासणी न हाेता एवढे माेठे कर्ज मंजूर हाेणे कसे शक्य आहे? ज्या तारखेचा अर्ज आहे त्याच दिवशी 13 लाख रुपये मंजूर हाेणे, काेणत्याही प्रत्यक्ष भेटी किंवा सह्यांशिवाय, कसे शक्य आहे? आधारकार्डवर मीरा राेड आणि रत्नागिरीचे पत्ते दाखवले असताना, कर्जाच्या अर्जात मात्र सांताक्रूजचा पत्ता आणि अनाेळखी माेबाइल क्रमांक नमूद करण्यात आला.
 
ही चूक नसून संस्थेने व्यवस्थित आखलेली बनावट याेजना हाेती.’ कर्जाच्या हप्त्यांतून एक विमा प्रीमियम वजा करण्यात आल्याचे स्टेटमेंटमध्ये दिसून आले. हा प्रीमियम त्यांच्या मृत वडिलांच्या नावे, त्यांच्याच खात्यातून 31 मे 2022 राेजी वसूल करण्यात आला हाेता, मृत्यूनंतरही. एसबीएफसी फायनान्सने विमा कंपनीला न सांगता पैसे वसूल केले आणि आता कारवाईस नकार देत आहे, पारकर सांगतात. कुटुंबाला, सुरुवातीला असे काेणते कर्ज मृत व्यक्तीने घेतल्याची कल्पनाही नव्हती.कंपनीच्या रिकव्हरी एजंटनी त्यांची बहीण आणि वहिनीला सांताक्रूज येथे जाऊन धमकी दिली, अपशब्द वापरले आणि ताेंडी त्रास दिला. कर्जाचा हप्ता भरला नाही मालमत्ता जप्त करायची धमकी एजंटनी दिली.
 
एसबीएफसी फायनान्स कंपनीचे स्पष्टीकरण : कंपनीच्या म्हणण्यानुसार, ‘आमच्या अंतर्गत तपासणीत आढळून आले, की कर्जाचा अर्ज आणि कागदपत्रे, अब्दुलवहाब अहमद पारकर (मृत व्यक्ती) आणि त्यांची सून यांनी सादर केली हाेती. कर्ज प्रक्रियेच्या दरम्यान त्या दाेघांनी अर्ज केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. ही कागदपत्रे अर्जदारांनी स्वतः सादर केली आहेत. आमच्याकडे याचे फाेटाे व व्हिडिओ पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही अब्दुलवहाब यांच्या सुनेच्या विराेधात आरबीआयकडे पुरावे सादर करत आहाेत.’
 
आयसीआयसीआय बँकेची प्रतिक्रिया : बँकेचे प्रतिनिधी म्हणाले, ‘हे कर्ज प्रकरण आमच्या सहयाेगी कंपनीकडे आलेले आहे. कर्ज घेणारे अर्जदार, त्यांचे कुटुंबीय आणि व्यावसायिक भागीदारांची ओळख, उत्पन्न, कागदपत्रांची पडताळणी, ही जबाबदारी त्या संस्थेची आहे, बँकेची नाही. आमच्या माहितीनुसार, सर्व प्रक्रिया झाल्यानंतरच कर्ज मंजूर करण्यात आले हाेते. या कर्जाची कागदपत्रे सह्या करून जमा केल्याचे प्रतिज्ञापत्र अब्दुलवहाब यांच्या दुसऱ्या मुलाने संस्थेला दिले आहे. विशेष म्हणजे, अब्दुलवहाब यांच्या मृत्यूनंतरही कुटुंबाने कर्जाचे हप्ते सुरु ठेवले.’ ‘माझ्या वडिलांनी अशा काेणत्याही कर्जाची माहिती आम्हाला दिली नव्हती. त्यांच्या मृत्यूनंतर हे कर्ज असल्याचे आमच्या समाेर आले,’ अयाझ पारकर.