कौटुंबिक न्यायालयातील नवनियुक्त वकील संघटनेच्या एकता पॅनेलने कार्यभार स्वीकारला

    12-Jul-2025
Total Views |
 
 ka
 
शिवाजीनगर, 11 जुले (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेल्या द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या एकता पॅनेलने 8 जुलै रोजी कार्यभार स्वीकारला. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम रुकमे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. असोसिएशनच्या मावळत्या कार्यकारिणीने नवनियुक्त कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्त केला. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचे माजी अध्यक्ष ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. राजेंद्र उमाप, निवडणूक निर्णय अधिकारी व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. संतोष नायडू आणि असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. गणेश कवडे यावेळी उपस्थित होते.
 
न्यायाधीश रुकमे यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि जबाबदारीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेकडून वकिलांच्या आरोग्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी ॲड. उमाप यांनी दिली, तर ॲड. निंबाळकर यांनी वकिलांना मार्गदर्शन केले. वकिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दैनंदिन कामकाजापासून आरोग्यविषयक बाबींवर प्रामुख्याने काम करण्यात येणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्षा ॲड. कल्पना निकम यांनी सांगितले.
 
पुढील वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबतची माहिती त्यांनी दिली. नवीन कार्यकारिणीकडून जुन्या कार्यकारिणीचा यावेळी सन्मान करण्यात आला. नवनियुक्त कार्यकारिणीला देखील गौरविण्यात आले. ॲड. भूषण कुलकर्णी आणि ॲड. कोमल देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. आसमा मुलाणी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात उपाध्यक्ष ॲड. स्मिता देशपांडे आणि ॲड. प्रथमेश भोईटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.