पुणे, 11जुलै (आ.प्र.) :
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... च्या नामघोषात गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात भाविकांनी दत्तमहाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ट्रस्टच्या 128व्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मंदिराला सुभाष सरपाले यांनी आकर्षक पुष्पसजावट व गणेश वाईकर यांनी विद्युत रोषणाई केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हलवाई परिवाराच्या वतीने लघुरुद्र करण्यात आला. प्रात: आरती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते झाली. दोन दत्तयागही करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांनी दत्तमहाराजांचे दर्शन घेतले.
मंदिराचा इतिहास, गुरुपौर्णिमेचे महात्म्य व पुणे शहराच्या आध्यात्मिक क्षेत्रात या मंदिराचे असलेले स्थान याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम- जहागिरदार यांनी त्यांना माहिती दिली. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले आणि श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागचे संस्थापक व प्रसिद्ध उद्योजक अमिता व राजकुमार अग्रवाल; तसेच श्री बालाजी सोसायटीचे बी. परनधामन व चेंदुरवर्धिनी यांच्या हस्ते असंख्य भाविकांच्या उपस्थितीत माध्यान्ह आरती झाली. रात्री मंदिरात गुरुवारनिमित्त साप्ताहिक पालखी काढण्यात आली.