बीड जिल्ह्यातील परळीत सध्या अस्तित्वात असलेल्या औष्णिक वीज केंद्रात आणखी वीज निर्मिती संच वाढवण्याची बाब तपासली असता ती व्यवहार्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन संच निर्मिती शक्य नसली, तरी संच क्रमांक एक ते पाचच्या जागेवर साैर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. राज्यातील वीजपुरवठा स्वस्त दरात असावा, यासाठी तासागणिक दराच्या आधारे स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यानुसार स्वस्त असलेली वीज ‘लाेड डिस्पॅस सेंटर’ आणि पीपीपीच्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) माध्यमातून ऑटाेमेटेड प्रक्रियेतून घ्यावी लागते. त्यानुसार बंधने घालण्यात आली असून, औष्णिक वीज उत्पादनाचा खर्च जास्त असल्याने नवीन औष्णिक वीज संच उभारणे शक्य नाही. संच क्रमांक 6, 7 व 8 सुरु असल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यक्षमतेवर किंवा राेजगारावर परिणाम झालेला नाही. परळी केंद्रातील नवव्या संचाच्या उभारणी संदर्भातील एमओडी (मेरिट ऑर्डर डिस्पॅच) उभारणीसंदर्भातील तांत्रिक अडचणी साेडवण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सागितले.