अमाल मलिक हा हिंदी सिनेमातला एक चांगला गायक आणि संगीतकार. ताे सांगताे की हिंदी सिनेमांत आता संगीतकाराला शून्य महत्त्व आहे. संगीतकाराने काम करायचं ते दिग्दर्शकाबराेबर. कारण हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. संपूर्ण सिनेमा एका सूत्रात गुंफणारं संगीत कसं पाहिजे हे दिग्दर्शकानेच ठरवलं पाहिजे.ताे आवर्जून अनीस बाजमीचा उल्लेख करताे. आमी जे ताेमार हे भुलभुलय्या फ्रँचायझीचं सिग्नेचर गाणं. त्यात आता नवं काय देणार, असं अमालला वाटत असताना अनीसने त्याला त्याची व्हिजन समजावून सांगितली आणि नव्या ढंगात ते गाणं रेकाॅर्ड झालं, लाेकप्रिय झालं. अमाल म्हणताे, असं इतर ठिकाणी हाेऊच शकत नाही.
हिराे लाेकप्रिय असेल तर त्याचे दाेनचार पंटर असतात. त्यांचं संगीताबद्दल काही म्हणणं असतं.कधी हिराेइन पाॅवरफुल असते, तिला काहीतरी अमुक प्रकाराने हवं असतं. निर्माता तर सर्वशक्तिमान.शिवाय म्युझिक लेबलच्या काही गरजा असतात.या सगळ्यांच्या नंतर लागला तर दिग्दर्शकाचा नंबर लागताे. संगीतकाराने काम कसं करायचं? अनेकदा तर एखाद्या सिनेमाचं संगीत रिलीझ झाल्यावर संगीतकाराला कळतं की आपलंही गाणं हाेतं ना या सिनेमात? अरेच्चा, रिजेक्ट झालं का? गाणं नाकारल्याचंच काेणी कळवत नाही तर ते काेणी आणि का नाकारलं हे कळणार कुठून?