संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार व्हावा

30 Jun 2025 11:34:29


CM

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून, उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा. त्यामुळे देशातील 90 टक्के प्रश्न कायमचे सुटतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लाॅच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लाेकार्पण सरन्यायाधीश भूषण गवई, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बाेलत हाेते.

नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधी व न्याय राज्यमंत्री अ‍ॅड.
आशिष जयस्वाल, सामाजिक न्यायविभागाचे प्रमुख सचिव हर्षदीप कांबळे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, माजी खासदार जाेगेंद्र कवाडे, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डाॅ. माधवी खाेडे-चवरे, संविधान उद्देशिका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीश गांधी आणि या समितीचे सदस्य यावेळी उपस्थित हाेते.भाैगाेलिकदृष्ट्या भारताचा मध्यबिंदू असलेल्या झिराे माईल येथे संविधान चाैक निर्माण झाला आणि आता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लाॅ परिसरात संविधान उद्देशिका पार्क उभा राहिला आहे. ही वास्तूही येथे भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डाॅ.आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण व प्रेरणा देईल, असा विश्वास न्या. गवई यांनी व्यक्त केला.

राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाने संविधान उद्देशिका पार्क उभारण्यासाठी पुढाकार घेतला व राज्य शासनाच्या अर्थ साहाय्याने आणि लाेकसहभागातून ही उत्तम संकल्पना प्रत्यक्षात आली. या पार्कच्या माध्यमातून संविधानातील माैलिक विचार या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह समस्त नागरिकांपर्यंत पाेहाेचतील याचा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून सार्थ अभिमान व समाधान असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी न्या.गवई यांचा सत्कार करण्यात आला, तर या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले गडकरी, मुख्यमंत्री व अन्य मान्यवरांचा न्या. गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
Powered By Sangraha 9.0