बारामाेटेची विहीर म्हणजेच बारा माेटा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी 12 माेटा लावल्या जात. सुमारे इसवी सन 1719 ते 1724 ह्या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भाेसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले.छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र, शाहू महाराज ह्यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले. लिंब गावाच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई हाेती. ह्या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या साेयीसाठी ह्या विहिरीची रचना केली गेली.विहिरीचा व्यास 50 फूट आणि खाेली 110 फूट असून आकार अष्टकाेनी आणि शिवलिंगाकृती आहे.
येथे माेडी लिपीतील एक शिलालेख आहे. जमिनीखालील महालात ही विहीर आहे. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्रे काेरली आहेत. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच मात्र त्यांसाेबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घाेड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील ह्या खांबावर काेरलेले दिसते. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चाेरवाटा आहेत. विहिरीवर 15 थाराेळी आहेत. ह्या चाेरावाटांतून वर आले की 12 माेटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते.प्रत्यक्ष मूळ विहिरीत प्रवेश करण्याआधी आड विहीरी साठी प्रशस्त पायऱ्या आणि एक भक्कम पूल आहे. तेथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्या साठी छुप्या भुयारी वाटा आहेत.