पुणे, 25 जून (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले होते. मात्र राज्य शासनाच्या नव्या वेळापत्रकानुसार प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्यासाठी एक महिन्याची वेळ वाढवून देण्यात आली आहे. प्रभाग रचनेच्या कामाचे सुधारित वेळापत्रक नगरविकास विभागाने सोमवारी प्रसिद्ध केले असून, आता 1 ते 5 ऑगस्ट या काळात प्रभाग रचनेचा अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनासह निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.
नगरविकास विभागाने यापूर्वी कालबद्ध कार्यक्रम 12 जूनला प्रसिद्ध केला होता. आता त्यात बदल करण्यात आला असून, सुधारित वेळापत्रक सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. जुन्या वेळापत्रकानुसार प्रभाग रचनेचा आराखडा सादर करण्याची 8 जुलैची मुदत होती. आता 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान हा आराखडा नगरविकास विभागाला सादर केला जाईल. 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभार रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली जाईल.
11 ते 16 जून दरम्यान प्रगणक गटांची मांडणी करणे, 17 ते 18 जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे, 19 जून ते 4 जुलै दरम्यान स्थळ पाहणी केली जाणार आहे. 1 ते 10 जुलै दरम्यान गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशे तयार करणे, 11 ते 24 जुलै दरम्यान नकाशात निश्चित केलेल्या प्रभागहद्दी जागेवर जाऊन तपासणे, 25 ते 31 जुलै दरम्यान प्रभाग रचनेचा मसुदा तयार करून त्यावर समितीने स्वाक्षरी करणे, 1 ते 5 ऑगस्ट दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागास सादर करणे, सहा ते 11 ऑगस्ट दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगास सादर करणे, 22 ते 28 ऑगस्ट प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व त्यावर हरकती व सूचना मागवणे.
29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याने प्राप्त हरकती-सूचनांवर सुनावणी घेणे, नऊ ते 15 सप्टेंबर दरम्यान सुनावणीनंतर हरकती-सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रभाग रचना अंतिम करून नगरविकास विभागाला सादर करणे, 16 ते 22 सप्टेंबर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेल्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगास सादर करणे, तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे अशी मुदतवाढ देण्यात आली आहे.