मुंबईत वीजवितरण परवान्याची महावितरणची मागणी

16 Jun 2025 14:34:20
 
mv
 
मुंबई, 14 जून (आ.प्र.) :
 
मुंबईत कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरांत बांद्रा ते दहिसर, पूर्व उपनगरांत विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखूर्द; तसेच चेना व काजुपाडासह मिरा-भाईंदर महापालिका या सर्व क्षेत्रांत महावितरणला वीजवितरणासाठी परवाना मिळावा, अशी मागणी करणारी याचिका कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे केली आहे. मुंबईत सध्या बेस्ट ही सार्वजनिक कंपनी, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड व टाटा पॉवर मुंबई या दोन खासगी कंपन्या वीजपुरवठा करतात. त्यांना समांतर परवाना देऊन महावितरणला मुंबईतही वीजपुरवठ्यास परवानगी मिळावी, अशी याचिका महावितरणने केली आहे.
 
महावितरण सध्या मुंबई शहर व उपनगरांतील वर उल्लेख केलेले क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात वीजवितरण करते. मुंबईतील मुलुंड व भांडूप या दोन उपनगरांतही महावितरण वीजपुरवठा करते. कोस्टल मार्ग आणि मेट्रो जाळ्यासह मुंबईत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारण्यामुळे निवासी रिअल इस्टेट क्षेत्रासह औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्राचा मोठा विस्तार होत आहे. डेटा सेंटर्सना मोठ्या प्रमाणात वीज लागते आणि अशी अनेक सेंटर्स मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांत विकसित करण्यात येत आहेत. या खेरीज सेवा क्षेत्रातील अनेक व्यवसायांचा विस्तार होत आहे. या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासणार आहे.
 
महावितरणने रिसोर्स प्लॅननुसार राज्याची सध्याची 42 हजार मेगावॉटची विजेची क्षमता आगामी पाच वर्षांत 81 हजार मेगावॉटवर नेण्यासाठी वीज खरेदी करार केले आहेत. त्यात हरितऊर्जेवर भर दिला असून, कंपनीला किफायतशीर दरात वीज मिळणार आहे. त्यामुळे महावितरणने प्रथमच आपल्या ग्राहकांसाठी वीजदरात कपातीचा प्रस्ताव आयोगासमोर सादर केला आहे. या प्लॅनमुळे राज्याची विजेची गरज भागवून मुंबईतही वीजपुरवठा करण्याइतकी पुरेशी वीज महावितरणकडे उपलब्ध असेल. राज्यासोबत मुंबईकरांनाही हरित आणि स्वस्त विजेचा लाभ देण्यासाठी आपल्याला मुंबईतही वीजवितरणाचा परवाना देण्याची मागणी महावितरणने आयोगाकडे केली आहे.
Powered By Sangraha 9.0