ठाणे, 12 जून (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मनसे नेते अविनाश जाधव यांनी आंदोलन छेडून थेट विक्रेत्यांचे स्टॉल रेल्वे स्थानकांतून उखडण्याची भाषा केली. जाधव यांचे हे वक्तव्य संतापजनक असून याच्या निषेधार्थ वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी बुधवारी ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने करून निषेध नोंदवला. वास्तविक लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले वृत्तपत्र ऊन, वारा, पावसात वृत्तपत्र विक्रेतेच वाचकांपर्यंत पोहोचवत असतात. तेव्हा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल तर खबरदार, असा इशारा महाराष्ट्र राज्य विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने दिला आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी (ता. 9 जून) घडलेल्या दुर्दैवी अपघातात बळी गेलेल्या, तसेच जखमी प्रवांशांबद्दल वृत्तपत्र विक्रेते संवेदनशील आहेत. परंतु, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या निषेध आंदोलनात रेल्वे स्थानकातील वृत्तपत्र विक्री स्टॉल उखडण्याची केलेली भाषा अशोभनीय व अव्यवहार्य आहे. दुर्दैवी रेल्वे दुर्घटना झाली, त्याबाबत बोलताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी वृत्तपत्रांचे स्टॉल उखडून टाकणार अशी भाषा केल्यामुळे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हाच एकमेव व्यवसाय असा आहे ज्यामध्ये मराठी टक्का टिकून आहे. त्यामुळे तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणाऱ्या मनसेच्या अविनाश जाधव यांचा वृत्तपत्र विक्रेत्यांनी बुधवारी दुपारी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन छेडून जाहीर निषेध नोंदवला.
महाराष्ट्र राज्य विक्रेता संघटना आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या नेतृत्वाखाली छेडलेल्या या आंदोलनात दिलीप चिंचोले, वैभव म्हात्रे, विवेक इसामे, निलेश कदम, संतोष शिंदे, केशव शिर्के, जितेंद्र क्षीरसागर, संदीप आवारे आदींसह अनेक वृत्तपत्र विक्रेते सहभागी झाले होते. यावेळी दत्ता घाडगे यांनी, मराठी माणसाच्या या व्यवसायावर गदा आणण्याच्या मनसेच्या कृतीबाबत मनसे नेतृत्वालाही जाणीव करून देत, अविनाश जाधव यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना योग्य ती समज देण्याची मागणी केली आहे.