ज्येष्ठ लेखक प्रकाश राऊळकर यांच्या आत्मकथनपर ग्रंथाचे प्रकाशन

    13-Jun-2025
Total Views |
 
 jeee
पुणे, 12 जून (आ.प्र.) : ‌
 
‘मित्रत्व हे माझ्या स्मृती माझी जीवनगंगा‌’ या ग्रंथाचे बलस्थान आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी - चिंचवडचे अध्यक्ष बकुळगंधकार राजन लाखे यांनी प्राधिकरण निगडी येथे मंगळवारी काढले. ज्येष्ठ लेखक प्रकाश राऊळकर लिखित ‌‘माझ्या स्मृती माझी जीवनगंगा‌’ या आत्मकथनपर ग्रंथाचे प्रकाशन करताना राजन लाखे बोलत होते. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बसंत बंग, संयोजक दिलीप मराठे आणि लेखक प्रकाश राऊळकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
 
राजन लाखे पुढे म्हणाले की, जीवनात येणाऱ्या असंख्य व्यक्ती आपल्याला कळत नकळत अनेक गोष्टी शिकवत असतात. तसेच, आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर ओलांडलेल्या पायऱ्या आयुष्याच्या उत्तरार्धात एखाद्या चित्रपटाप्रमाणे स्मरत राहतात. हीच अनुभूती देणारा ‌‘माझ्या स्मृती माझी जीवनगंगा‌’ हा ग्रंथ म्हणजे प्रकाश राऊळकर यांच्या अमृतमहोत्सवी अनुभवाचे संचित आहे. हे संचित गंगेप्रमाणे प्रवाही असून, सुखदुःखाचे क्षण त्यांत साक्षेपी वृत्तीने मांडले आहेत. जीवनाविषयी अहंकारविरहित कृतज्ञता या लेखनातून व्यक्त होते.
 
डॉ. बसंत बंग यांनी राऊळकर यांच्याशी असलेल्या कौटुंबिक आठवणींना उजाळा देताना, ‌‘प्रकाशकाका यांच्यामुळे वडील काय असतात हे मला कळाले. त्यांच्यासारख्या व्यक्ती या सामाजिक संपत्तीसमान आहेत,‌’ अशा हृद्य भावना व्यक्त केल्या. तृप्ती देवरुखकर यांनी मनोगतातून वडील, लेखक आणि तुकोबांची गाथा आपल्या सुंदर हस्ताक्षरात लिहून काढणारे कलाकार असे राऊळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू भावुक स्वरातून मांडले. दिलीप मराठे यांनी प्रास्ताविकातून, ‌‘राऊळकर हे एक कलासक्त व्यक्तिमत्त्व असून लेखन अन्‌‍ वाचन चळवळीचे ते वारकरी आहेत. गत आयुष्यातील संघर्षाचे आणि मानवी वर्तणुकीचे वैविध्यपूर्ण अनुभव त्यांनी आपल्या आत्मचरित्रात्मक ग्रंथात शब्दबद्ध केले आहेत,‌’ असे मत मांडले.
 
लेखक प्रकाश राऊळकर यांनी आपल्या मनोगतातून, ‌‘वास्तविक रंगरेषांमध्ये रमणारा मी रेखाटणकार आहे; परंतु कोरोना काळात 1956 सालापासूनच्या जीवनातील काही आठवणी मी लिहिल्या. त्याला मित्रांसह विविध स्तरांवर उत्तम दाद मिळाली. त्यामुळे लेखनाला हुरूप आला,‌’ अशा शब्दांत आपला लेखनप्रवास उलगडून सांगितला. गणेशस्तवन आणि सरस्वतीपूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विधिवत औक्षण करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गिरीश चौक यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश राऊळकर यांनी आभार मानल