ऊर्जा क्षेत्रातील आव्हानांसाठी सांघिकपणे काम करावे

12 Jun 2025 14:05:57
 
ur
 
मुंबई, 11 जून (आ.प्र.) :
 
महापारेषणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी 20 वर्षांत चांगले काम केले आहे. भविष्यात ऊर्जा क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सांघिकपणे काम केल्यास आपण स्पर्धेतही टिकून राहू, असे आवाहन राज्य विद्युत पारेषण कंपनीचे (महापारेषण) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी केले. वांद्य्रातील बालगंधर्व रंगमंदिरात महापारेषणचा 20वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजिलेल्या राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभात डॉ. संजीव कुमार बोलत होते. राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (स्वतंत्र) विश्वास पाठक, महापारेषणचे संचालक सतीश चव्हाण, संचालक (प्रकल्प) अविनाश निंबाळकर, संचालक तृप्ती मुधोळकर, अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने, कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर या वेळी उपस्थित होते.
 
सुरुवातीला मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महापारेषणचे सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. देशाची अर्थव्यवस्था आता जगात चौथ्या क्रमांकावर आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. सध्या विजेची मागणी 30 हजार मेगावॉटपर्यंत झाली आहे. महापारेषणने केलेली प्रगती उल्लेखनीय असून, स्पर्धेच्या युगात सक्षम होण्यासाठी तांत्रिक बदल स्वीकारून महापारेषणने अधिक जोमाने काम करावे, असे पाठक यांनी सांगितले.
 
सुचिता भिकाने यांनी प्रास्ताविक केले. सतीश चव्हाण, अविनाश निंबाळकर, तृप्ती मुधोळकर, शशांक जेवळीकर यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सेफ्टी मॅन्युअल व डिझास्टर मॅन्युअलचे प्रकाशन डॉ. संजीव कुमार व विश्वास पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. ऊन-पावसाची तमा न बाळगता विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. महापारेषणचे अधिकारी- कर्मचाऱ्यांनीही विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम या वेळी सादर केले. जनसंपर्क विभागाच्या समन्वयातून महापारेषणच्या सर्वंकष कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या चित्रफितीने वातावरण ऊर्जामय झाले. प्रसिद्ध गायिका संजीवनी भेलांडे व गायक मदन शुक्ला यांच्या गीतांनी कार्यक्रमाला बहार आली.
Powered By Sangraha 9.0