पुणे, 9 जून (आ.प्र.) :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने 133 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्या सजावटीच्या तयारीच्या प्रारंभी वासापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वासा पूजनाने सजावटीचा श्रीगणेशा झाला. बुधवार पेठेतील उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगणात वासापूजन झाले. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे 108 दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवासस्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे साकारण्यात येत असून, भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. प्रतिकृतीचा आकार 120 फूट लांब, 90 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे. यात 30 भव्य खांब असून, 500 देवी- देवता, ऋषीमुनींच्या मूर्ती असणार आहेत.
गाभारा सुवर्ण रंगाने सजवण्यात येणार असून, संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत राहणार असून, भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक विनायक रासकर मंदिराचे काम करणार असून, मंडप व्यवस्था काळे मांडववाले करणार आहेत.