पुणे, 9 जून (आ.प्र.) :
‘शून्य विद्युत अपघाता’च्या जनजागृतीसाठी महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहात पुणे परिमंडलातील साडेपाच हजारांवर अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयांत एकाच वेळी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली. वर्धापन दिनानिमित्त पिंपरीत रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित कार्यक्रमात पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे (महावितरण) व अनिल कोलप (महापारेषण), विद्युत निरीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्यासह अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली. पुणे परिमंडलांतर्गत मंडल, विभाग, उपविभाग व शाखा यासह 244 कार्यालयांत साडेपाच हजारांवर सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी विद्युत सुरक्षेची शपथ घेतली.
यावेळी अधीक्षक अभियंते सर्वश्री ज्ञानदेव पडळकर, युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, अमित कुलकर्णी, विठ्ठल भुजबळ, अनिल घोगरे, संजीव नेहते आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच ग्राहकांच्या तक्रारींची ताबडतोब दखल घेऊन त्यांच्याही सुरक्षिततेची काळजी घेण्याची शपथपूर्वक ग्वाही देण्यात आली. महावितरणच्या मोबाइल ॲप व वेबसाइटद्वारे ऑनलाइन विद्युत सुरक्षा प्रश्नमंजूषेत पुणे परिमंडलातील साडेपाच हजारांवर अभियंते, अधिकारी, कर्मचारी व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांनी 100 टक्के सहभाग नोंदवत प्रमाणपत्र मिळवले. शालेय विद्यार्थी व ग्राहकांनीही स्वतंत्र ऑनलाइन प्रश्नमंजूषेला मोठा प्रतिसाद दिला.
यासह सर्वच 12 विभागांतर्गत शालेय विद्यार्थी व कर्मचारी पाल्यांसाठी विद्युत सुरक्षेवर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. विद्युत सुरक्षा सप्ताहात पुणे व पिंपरी चिंचवडसह मुळशी, वेल्हे, जुन्नर, खेड, मावळ, हवेली, आंबेगाव, तालुक्यांत महावितरणकडून प्रबोधनाचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात ग्रामीण भागातील गर्दीची ठिकाणे, शहरातील रहिवासी सोसायट्यांमध्ये विद्युत सुरक्षेची थेट संवाद साधून माहिती देण्यात आली. यासह प्रत्येक विभागात प्रभात फेरी, बाईक रॅली, मोठे फलक, पोस्टर्स, तसेच पॅमप्लेट्द्वारे हजारो नागरिकांशी थेट संवाद साधून विद्युत सुरक्षेची माहिती देण्यात आली.