मुंबई, 8 मे (आ.प्र.) :
महापारेषणच्या कार्यकारी संचालकपदी (मानव संसाधन) अतिरिक्त जिल्हाधिकारी सुचिता भिकाने यांची नियुक्ती करण्यात आली. भिकाने यापूर्वी कोकण भवनात उपायुक्त (भूसंपादन) या पदावर कार्यरत होत्या. भिकाने यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले असून, दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तसेच, त्यांनी विधी शाखेची (एलएलबी) पदवीही घेतली आहे. त्यानंतर 2010 मध्ये त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत रूजू झाल्या. त्यांनी सांगलीत रोजगार हमी योजनेत चार वर्षे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात साडेचार वर्षे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन व पुनर्वसन) म्हणून काम केले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणमध्ये प्रांताधिकारी म्हणूनही काम केल्याचा त्यांचा अनुभव आहे. सांगलीत रोजगार हमी योजना, जलयुक्त शिवार अभियान व शतकोटी वृक्ष लागवडीत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या या कामांमुळे उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे.