वीजबिलांच्या थकबाकी वसुलीसह नवीन जोडण्यांना वेग द्या

    09-May-2025
Total Views |
 
 vij
पुणे, 8 मे (आ.प्र.) :
 
वीजबिलांची थकबाकी वाढण्यास पुन्हा सुरवात झाली आहे. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसुलीला वेग द्यावा. तसेच, नवीन वीजजोडण्या देण्यासह नाव बदलण्याच्या अर्जांवर कार्यवाहीचा वेग आणखी वाढवावा, असे निर्देश पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी दिले. महावितरणच्या पुणे परिमंडलाची आढावा बैठक गणेशखिंड येथील ‌‘प्रकाशभवन'मध्ये झाली. त्यात मुख्य अभियंता काकडे बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंते सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, ज्ञानदेव पडळकर, संजीव नेहेते आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे गेल्या मार्चमध्ये 69 कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी 22 कोटी 54 लाखांच्या थकीत बिलांचा भरणा संबंधित ग्राहकांनी केला आहे, तर 41791 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
 
उर्वरित 46 कोटी 46 लाखांच्या थकबाकी वसुलीसह थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यास आणखी वेग द्यावा, असे निर्देश काकडे यांनी दिले. पायाभूत वीजयंत्रणा अस्तित्वात आहे, अशा ठिकाणी नवीन वीजजोडणी तत्परतेने द्यावी. मालकी बदलल्यानंतर वीजबिलांत नाव बदलांचे, तसेच पत्ता बदल किंवा वीजभार वाढीचे अर्ज ग्राहकांकडून ऑनलाइन प्राप्त होतात. या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी. काही कागदपत्रांची कमतरता किंवा आवश्यकता असल्यास अर्ज नामंजूर करण्याआधी संबंधित ग्राहकांना तातडीने कळवून त्याची पूर्तता करावी. नवीन वीजजोडणी, वीजबिलांच्या तक्रारींसह इतर सर्व सेवा ग्राहकसेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित कालावधीत द्याव्यात, असे निर्देश काकडे यांनी दिले.