दृष्टिहीन रेश्माने मिळवले 83.33 टक्के गुण

13 May 2025 14:25:28
 dru
मुंबई, 12 मे (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुलुंडच्या वझे-केळकर वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या रेश्मा पाटोळे या विद्यार्थिनीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. जन्मांध असलेल्या रेश्माने वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ तिला मिळाले. वाणिज्य शाखेतून तिने 83.33 टक्के गुण मिळवत अभूतपूर्व यश मिळवले. रेश्मा जन्मापासून 100 टक्के दृष्टिहीन आहे; परंतु या शारीरिक मर्यादेचा अडसर तिने शिक्षणात कधीही येऊ दिला नाही. बारावीचा अभ्यास करताना तिला प्रत्येक गोष्ट ऐकून करावी लागत होती. त्याविषयी सांगताना रेश्मा म्हणाली, ‌‘दिसत नसल्यामुळे मी ऑडिओ ऐकून प्रत्येक विषय समजून घेतला. माझ्या शिक्षकांनीही मला खूप मदत केली. मला घरातूनही पूर्ण पाठिंबा मिळाला.'
 
तिचे वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. आई गृहिणी, तर बहीण नर्स आहे. याचप्रमाणे तिला तिच्या मित्र-मैत्रिणींनीही खूप मदत केली. महाविद्यालयात जाता-येताना माझे मित्र-मैत्रिणी नेहमी माझ्यासोबत असायचे, असेही तिने स्पष्ट केले. रेश्माला पदवीचे शिक्षण पूर्ण करावयाचे आहे. त्यानंतर करिअरचा विचार करून पुढील दिशा ठरवीन, असे तिने सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0