पुणे, 29 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
बाणेर गावाचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचवेळी भव्य कुस्ती स्पर्धाही होणार आहे. 1 मे रोजी होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चांदेरे म्हणाले की, श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त 30 एप्रिल रोजी श्री भैरवनाथ महाराजांची पालखी सोहळा होईल. रात्री 9 वाजता धनकुडे फॉर्मजवळील सीमा पार्कच्या मैदानावर गौतमी पाटील यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
महाराष्ट्र दिन 1 मे रोजी सकाळी 9 वाजता बाणेर येथील कै. सोपानराव बाबूराव कटके विद्यालयातील मैदानावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने व पुणे शहर कुस्तीगीर संघटनेच्या सहकार्याने मॅटवरील बाणेर केसरी कुस्ती स्पर्धा होईल. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व बाणेरचे प्रथम नगरसेवक ज्ञानेश्वर तपकीर, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी गटवारी असून, आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येतील.
खुल्या गटातील विजेत्या पैलवानाला अडीच लाख, द्वितीय क्रमांक दोन लाख, तृतीय क्रमांकासाठी दीड लाख, तर चतुर्थ क्रमांकासाठी एक लाख बक्षीस असेल. अन्य गटांसाठीही बक्षिसाची मोठी रक्कम देण्यात येईल. या स्पर्धेकरिता खेळाडूंचे वजन बुधवारी (30 एप्रिल) सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत कै. सोपानराव बाबूराव कटके, मनपा शाळा, बाणेर येथे घेण्यात येणार आहे. यावेळी महिला कुस्तीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कुमारी ज्ञानेश्वरी पायगुडे विरुद्ध कुमारी संजना दिसले आणि कुमारी सिद्धी ढमढेरे विरुद्ध कुमारी अर्पिता गोळे अशी या महिलांची कुस्तीचे सामने रंगणार आहेत. या स्पर्धेतील बक्षीसपात्र न ठरणाऱ्या सर्व पराभूत कुस्ती पैलवानांना मानधन दिले जाईल.
बक्षीस वितरण त्याचदिवशी रात्री साडेआठ वाजता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. पत्रकार परिषदेस स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे, बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप मुरकुटे, गुलाबराव तापकीर, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, माणिक गांधीले, माजी सरपंच जंगल रणावरे, अर्जुन शिंदे, रामदास धनकुडे, मल्हारी सायकर, नासिर सय्यद, राजेंद्र कळमकर, जगन्नाथ धनकुडे आदी मान्यवर उपस्थित होते.