पुणे, 29 एप्रिल (आ.प्र.) :
लोकशाहीतील कायदे मंडळ, न्यायव्यवस्था, प्रशासन आणि पत्रकारिता या चार स्तंभांची एकी देशाने कधी अनुभवली नव्हती. आज हे सगळे वारकरी झाले आहेत. मतभेद टाळण्याकडे सर्वांचा कल आहे. वन नेशन वन इंट्रेस्ट या विचारातून सर्वांनी मिळून आदर्श भारत घडवताना मतभेद आणि बोलण्याची संधी आपण गमावली आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी सोमवारी व्यक्त केले. सध्याचा भारत अखंड आहे. तो आणखी अखंड होणार नाही. मात्र, या अखंड भारतासाठी सध्याचा भारत खंड खंड करीत आहोत, अशी टीका त्यांनी केली. पत्रकार वरुणराज भिडे मित्र परिवारातर्फे पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमतचे सहयोगी संपादक यदू जोशी (मुंबई) यांना पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार; तसेच महाराष्ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर, एबीपी माझाचे प्रतिनिधी मिकी घई (पुणे) आणि लोकसत्ताचे प्रतिनिधी दिगंबर शिंदे (सांगली) यांना आश्वासक पत्रकारिता पुरस्कार परुळेकर आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आला. मंडळाचे प्रमुख ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि अंकुश काकडे उपस्थित होते. पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमात पहिला क्रमांक मिळवलेले आनंद पवार यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय कार्यालयातर्फे पुरस्कार देण्यात आला. परुळेकर म्हणाले, आजच्या काळात प्रत्येकाला कर्तव्य निभावणे कठीण झाले आहे.
विलक्षण कंगोरे असलेले समाजमन गढूळ झाले आहे. एकमेकांचा आदर करण्याची परंपरा संपली आहे. भाषेची अभिरुची घसरली आहे. येथे पूर्वी मतभेदाला जागा होती. आता मित्र की शत्रू अशी विभागणी झाली आहे. आपण सर्वधर्मीय लोक समाज आणि देश म्हणून एक आहोत. एकमेकांशिवाय जगण्याची कल्पना केली तर सर्व कोलमडणार आहोत. कोणी आपल्याला आवडत नाही म्हणून त्यांना बेदखल करता येत नाही. पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदूंचा पाकिस्तान होऊ दिला नाही. धर्मावर आधारित देशाची निर्मिती जिनांना हवी होती. महात्मा गांधींना असा देश नको होता. भारताचा हिंदू पाकिस्तान होण्यापासून रोखण्याची जबाबदारी पत्रकार, कलावंत आणि विचारी लोकांची आहे. एक तर उजवीकडे किंवा डावीकडे राहून जगता येते. मात्र, मध्यममार्गाने चालत असू, तर गोंधळ उडण्याचा धोका आहे. माध्यमेही हल्ली फक्त प्रतिक्रिया घेण्यासाठी झाली आहेत. विरोधी राजकारण करणे अवघड झाले आहे.
संसदेचे प्रक्षेपण बंद झाले तर किती खासदार बोलतील, हा प्रश्न आहे. विरोधकांसाठी माध्यमे आवाज असतात. मात्र, बातमीमागची बातमी मांडण्याचे स्वातंत्र्य आज आहे का? पुलवामा हल्ल्यानंतर जात नाही, धर्म विचारून मारले, या अनेकांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमुळे देशातील विखार आणि ध्रुवीकरण दिसून आले, अशी टीका कोल्हे यांनी केली. यदू जोशी, प्रशांत आहेर, मिकी घई आणि दिगंबर शिंदे यांची भाषणे झाली. अंकुश काकडे यांच्या खुसखुशीत निवेदनाने हा कार्यक्रम रंगला. सतीश देसाई, शैलेश गुजर, सूर्यकांत पाठक यांनी ओळख करून दिली. निवड समितीतर्फे मुकुंद संगोराम यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाश भोंडे यांनी आभार मानले.