‌‘दिलखुलास'मध्ये प्रिया खान यांची मुलाखत

    29-Apr-2025
Total Views |
 
 di
मुंबई, 28 एप्रिल (आ.प्र.) :
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम- 2025-26 जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत शासनासोबत काम करण्यासाठी युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार असल्याने जास्तीत जास्त तरुणांनी अर्ज करून शासनासोबत कामाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी दिलखुलास कार्यक्रमातून केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात प्रिया खान यांच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाबाबत घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार (29), बुधवार (30 एप्रिल) तसेच गुरुवारी (1 मे) आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाइल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
 
निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे. राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत कामाचा अनुभव मिळावा; तसेच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी, यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. फेलोंच्या निवडीसंदर्भातील निकष, नियुक्तीसंदर्भातील अटी-शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेषा व अंमलबजावणीबाबत शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी उमेदवारांना 5 मेपर्यंत अर्ज करता येईल. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचे निकष, निवड प्रक्रिया, अनुभव आणि अर्ज प्रक्रियेबाबत या कार्यक्रमातून प्रिया खान यांनी माहिती दिली आहे.