पिंपरी, 28 एप्रिल (आ.प्र.) :
विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबत आयुष्यात आपण चांगले माणूस म्हणून कसे घडू, यावर लक्ष केंद्रित करावे. असा यशस्वी होण्याचा कानमंत्र आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात वार्षिक स्नेह उत्सव, गुणगौरव आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सहायक आयुक्त शिक्षण विभाग विजयकुमार थोरात, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर; तसेच प्राथमिक शाळांमधील सर्व मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षण विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी स्वागत केले, तर शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू देऊन प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांचा सन्मान केला. आयुक्त शेखर सिंह यांनी शिक्षण क्षेत्रात अविरत काम करत राहिल्यास सर्व समस्यांना तोंड देऊ शकू, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबत आयुष्यात आपण चांगले माणूस म्हणून घडू यावर लक्ष केंद्रित करावे. गेल्या तीन वर्षांत शिक्षण विभागात शिक्षक आणि पालकांच्या मदतीने खूप चांगले बदल घडवून आणले आहेत. आजही अनेक शाळांच्या खोल्या व मैदानांच्या समस्या आहेत; परंतु येणाऱ्या पाच वर्षांत आपण असेच काम करत राहिलो तर सर्व समस्यांना तोंड देऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. या वर्षी भोसरी, दापोडी, दिघी येथील शाळांमध्ये डान्सरूम, कलाकक्ष, स्टाफ रूम अशा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पवित्र पोर्टलद्वारे मिळणार 300 शिक्षक
सहायक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी सांगितले की, सारथी पोर्टलद्वारे 88 टक्के तक्रारी निकाली काढल्या आहेत आणि 35 तक्रारी प्रलंबित आहेत. ज्यांवर देखील लवकरच कारवाई होणार आहे. जून-जुलैमध्ये पवित्र पोर्टलद्वारे 250 ते 300 कायमस्वरूपी शिक्षक शाळांना मिळणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. आयुक्त शेखर सिंह महापालिकेतील शिक्षण विभागाला प्राधान्य देत मार्गदर्शन करीत असल्याबद्दल थोरात यांनी त्यांचे आभार मानले.