सिंबायोसिस पत्रकारितेतील नवीन कौशल्य शिकविणार

    28-Apr-2025
Total Views |
 
sim
 
पुणे, 27 एप्रिल (आ.प्र) :
 
पुणे शहरातील पत्रकारांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारितेतील नवनवीन कौशल्य शिकविण्याची जबाबदारी सिंबायोसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाने घेतली आहे. पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि सिंबायोसिसमध्ये शुक्रवारी याबाबतचा सामंजस्य करार शुक्रवारी (दि. 25 एप्रिल) करण्यात आला. दरम्यान, या करारानुसार पहिल्या टप्प्यात पुणे पत्रकार प्रतिष्ठान व श्रमिक पत्रकार संघ आणि सिंबायोसिस इंटरनॅशनल अभिमत विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तीनदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण येत्या सोमवारी (28 एप्रिल) सुरू होणार आहे.
 
कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन सर्वच क्षेत्रांमध्ये वेगाने होऊ लागले आहे. पत्रकारितेसारख्या क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान नेमके कशा प्रकारे वापरले जाऊ शकते, याचे हे प्रशिक्षण असणार आहे. यासाठीचा हा सामंजस्य करार आहे. यावेळी सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका आणि सिंबायोसिसच्या प्र-कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह गजेंद्र बडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनच्या संचालक डॉ. रुची जग्गी, उपसंचालक डॉ. सुशोभन पाटणकर, शिखा कोचर, डॉ. स्नेहा गोरे, डॉ. अभिषेक रॉय, प्रतिष्ठानचे खजिनदार प्रसाद कुलकर्णी, विश्वस्त चंद्रकांत हंचाटे आणि राजेंद्र पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
 
यावेळी डॉ. येरवडेकर म्हणाल्या, ‌‘पुण्यातील विविध जनसमूहांच्या हितासाठी काम करणे ही विद्यापीठाची नैतिक जबाबदारी असल्याचे आम्ही मानतो. सिंबायोसिसच्या माध्यमातून पत्रकारांना नवीन कौशल्ये शिकवणारे, अप-स्किलिंग करणारे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे, ही आनंदाची बाब आहे' सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनमधील पत्रकारितेचे प्राध्यापक हे प्रशिक्षण देणार आहेत. यामध्ये एआय तंत्रज्ञानाची व्याप्ती, पत्रकारितेसाठी त्याचे होऊ शकणारे विविध फायदे आणि त्यासाठी उपलब्ध असणारी साधने किंवा सॉफ्टवेअर कसे वापरावे आदी विषयांचा समावेश असणार आहे.