संचालकांच्या आशीर्वादाने बाजारसमितीच्या दारातच अनधिकृत टपऱ्या

    23-Apr-2025
Total Views |
 
 baj
पुणे, 22 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुणे बाजार समितीच्या संचालक मंडळाचे कारनामे थांबायचे नाव घेत नाहीत. संचालकांनीच बाजार घटकांना अडथळा होईल अशा टपऱ्या टाकण्यास सुरुवात केली आहे. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बाजूसच टपरी पडल्याने संचालक मंडळाच्या टपरी कारभारावर टीका होऊ लागली आहे. बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून बाजार आवारातील मोक्याच्या ठिकाणी अनधिकृत टपऱ्यांचे पेव फुटले आहे. आत्तापर्यंत केवळ फळे- भाजीपाला विभागात टपऱ्या पडत होत्या. आता गूळ-भुसार बाजारात देखील टपऱ्या वाढू लागल्या आहेत. आत्ताच गूळ-भुसार बाजाराच्या गेट क्रमांक-2 लगत भल्या मोठ्या टपरीचे काम सुरू झाले आहे.
 
चार वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासकांच्या काळात बाजाराला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या हटविल्या होत्या. मात्र, आता संचालक मंडळ आल्यानंतर मोक्याच्या ठिकाणी पुन्हा टपऱ्या टाकण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बाजारात वाहतूक कोंडी होत आहे; तसेच वाहतूक कोंडीमुळे शेतमाल खरेदी करण्यास येणाऱ्या व्यापाऱ्यांना देखील त्रास होत आहे. कोंडीमुळे अनेकदा शेतमाल शिल्लक राहून शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे आडतदार सांगतात. याबाबत बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
 
प्रत्येक संचालकाला दोन टपऱ्या
बाजार समितीत संचालक मंडळ निवडून आल्यानंतरच टपऱ्या वाढत चालल्या आहेत. प्रत्येक वेळी नवीन टपरी पडली की बाजारातील काही संघटना प्रशासनाला आंदोलन करून बाजार बंदचा इशारा देते. त्यानंतर टपऱ्या दुसरीकडे हलवल्या जातात. त्यामुळे पुढील काळात बाजार समितीत टपऱ्यांचा बाजार होणार, हे निश्चित मानले जात आहे.