पिंपरी, 22 एप्रिल (आ.प्र.) :
महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेस कर संकलन वाढीसाठी केलेल्या विविध उपाययोजनांमध्ये महापालिका अव्वल ठरली असून, या पुरस्काराअंतर्गत 10 लाख रुपयांचे पारितोषिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त शेखर सिंह यांना प्रदान करण्यात आले. मुंबई येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या नागरी सेवा दिन-2025 आणि राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023- 24 व 2024-25 पारितोषिक प्रदान समारंभात पारितोषिक देण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ताकर संकलन वाढीसाठी राबविलेले नवोपक्रम, ऑनलाइन सुविधा, मालमत्ता जप्ती लिलाव, जिओ सिक्वेन्सिंग, यूपीआयसी आयडी आदी प्रस्तावांमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याच्या कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘यशदा'चे अतिरिक्त महासंचालक राहुल महिवाल, पिंपरी-चिंचवड पालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागांचे, जिल्ह्यांचे, महापालिकांचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. राज्यस्तरीय समितीने महापालिकेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाची सखोल छाननी करून ही निवड केली. मालमत्ताकर वाढीसाठी महापालिकेने राबवलेले उपक्रम, प्रशासनातील पारदर्शकता, तांत्रिक साधनांचा वापर, लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न आणि उत्तम कार्यप्रणाली हे सर्व पैलू यामध्ये महत्त्वाचे ठरले.
कटिबद्ध जनहिताय या महापालिकेच्या ब्रीदवाक्यानुसार महापालिका कामकाज करत आहे. करसंकलन विभागाने पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, महिला सहभाग आणि नागरिकांच्या सक्रिय सहकार्याच्या आधारावर मालमत्ताकर व्यवस्थापनात उल्लेखनीय बदल घडवून आणला आहे. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानाअंतर्गत मिळालेला हा पुरस्कार महापालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे फलित असून, नागरिकांचा विश्वास आणि सहभाग हेच आमचे खरे बळ आहे. भविष्यातही लोकाभिमुख, गतिमान आणि उत्तरदायित्वपूर्ण प्रशासन देण्याची आमची कटिबद्धता अशीच कायम राहील.
-शेखर सिंह (आयुक्त, पिंपरीचिंचवड महापालिका)