पुणे, 22 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
कामकाजात गतिमानता आणण्यासाठी पुणे महापालिकेने विकसित केलेल्या आयडब्ल्यूएमएस संगणक प्रणालीला राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियान स्पर्धा 2023-24 चे सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळाले. नागरी सेवादिनी आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सहा लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या. प्रशासनातील कामकाजात गती आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
पुणे महापालिकेने मागील तीन वर्षांपासून आयडब्ल्यूएमएस ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. महापालिकेच्या वतीने अंदाजपत्रकीय तरतुदीतून विविध विकासकामे करण्यात येतात. या विकासकामांचे संपूर्ण तांत्रिक व प्रशासकीय कामकाज एकसंध, तंत्रशुद्ध, अचूक, गुणवत्तापूर्वक आणि लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने 2022 मध्ये ही संगणक प्रणाली तयार करण्याचे काम हाती घेतले व अवघ्या काही कालावधीमध्येच तिचे संचलनही सुंरू केले. तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या प्रयत्नांतून सुरू झालेल्या या प्रणालीद्वारे मागील तीन आर्थिक वर्षांत कामांना तांत्रिक मान्यता, निविदा मान्यता, कामांचे अंदाजे व प्रत्यक्ष मोजमाप व त्यावरील प्रत्यक्ष खर्च हा प्रणालीद्वारे संचलित व नियंत्रित करण्यात आला.
मागील दोन वर्षांत माजी आयुक्त विक्रम कुमार आणि विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रणालीतील काही त्रुटी दूर करून कामांची बिलेदेखील प्रणालीच्या माध्यमातून देण्यात येऊ लागल्यानंतर कामाचा वेग आणि पारदर्शकता वाढली आहे. मागील दोन आर्थिक वर्षांत तब्बल तीन हजार दोनशे कोटींच्या कामांचे नियोजन या प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.