पुणे, 14 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
महाविकास आघाडीतील सर्वांत मोठा पक्ष म्हणून आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पूर्वीच दिला आहे. मात्र, सरकारकडून विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा केली जात नाही. सरकार विरोधी पक्षाला इतके का घाबरते, असा सवाल माजी गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी उपस्थित केला. पुणे शहर काँग्रेसच्या निरीक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर सतेज पाटील बैठकीच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अजित दरेकर, बाळासाहेब मारणे, सौरभ आमराळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटील म्हणाले, लोकशाहीसाठी विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे. आम्ही नाव देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडून त्यावर निर्णय घेतला जात नाही. सत्ताधारी विरोधी पक्षाला इतके का घाबरतात, हे आम्हाला समजत नाही. सत्तेसाठी जे कोणी काँग्रेस सोडून जात आहेत त्यांना आम्ही काही करू शकत नाही. मात्र, जे पक्षात राहतील ते आमचे शिलेदार असतील. प्रदेशाध्यक्षांची इच्छा पक्षासाठी वेळ देणाऱ्यांना संधी देण्याची आहे. त्यानुसार भविष्यात संघटनात्मक बदल होतील. महापालिकेत प्रशासकराज येऊन तीन वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. एकाच कामाचे बिल महापालिका आणि जिल्हा नियोजन मंडळाकडून काढली जात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यात गैरव्यवहार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील काळात आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासोबतच प्रशासक काळात महापालिकेमध्ये झालेले गैरव्यवहार जनतेसमोर आणू. आगामी निवडणुका स्वतंत्र लढायच्या की महाविकास आघाडीच्या माध्यमातून, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. आता मात्र आम्ही संघटनात्मक बांधणी आणि सत्ताधाऱ्यांचा गैरव्यवहार जनतेसमोर आणण्यावर भर देणार आहोत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटना दाबून ठेवण्यासारखी नाही. यातील दोषींवर कारवाई व्हावी, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.