आता अनधिकृत होर्डिंग रडारवर; कारवाई होणार

    15-Apr-2025
Total Views |
 
 mah
पिंपरी, 14 एप्रिल (आ.प्र.) :
 
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी अनधिकृत होर्डिंगबाबत पावले उचलली आहेत. पीएमआरडी कार्यक्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगची सद्यस्थिती जाणून घेत तातडीने महामार्ग, गर्दीची ठिकाणे; तसेच पावसाळ्यापूर्वी धोकादायक ठरणारे होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश विभागाला दिले आहेत, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने 15 जूनपर्यंत होर्डिंगवर जाहिरातबाजी करू नये, असे आदेश दिले आहेत. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे. 8 एप्रिलपर्यंत संबंधितांनी होर्डिंगच्या परवानगीसाठी दाखल केलेल्या प्रस्तावांच्या प्रती कार्यालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
 
सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर पीएमआरडीएच्या वतीने पुढील आठवड्यात अनधिकृत होर्डिंग हटवण्यात येणार आहेत. पीएमआरडीएच्या सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी येथे होर्डिंगधारक व होर्डिंग संघटनेची बैठक झाली. उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार रवींद्र रांजणे, सचिन मस्के, सहायक नगररचनाकार राहुल गीते, शाखा अभियंता विष्णू आव्हाड, ऋतुराज सोनवणे, दीप्ती घुसे, विशाल भोरे, होर्डिंगधारक व होर्डिंग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जमदाडे, उपाध्यक्ष शेखर मते आदी उपस्थित होते. होर्डिंगला परवानगी घेणे, धोकादायक होर्डिंग काढून घेणे यासह संघटनेच्या अडचणींबाबत बैठकीत चर्चा झाली. अवकाळी, वादळी वाऱ्याच्या हवामान अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत धोकादायक होर्डिंग काढण्याचे निर्देश बैठकीत दिले.
 
दुर्घटना घडल्यास थेट होर्डिंगधारक जबाबदार
अवकाळी, वादळी वाऱ्यामुळे रहदारीच्या जागेसह मुख्य चौकांतील होर्डिंग काढावेत. असे न झाल्यास होणाऱ्या दुर्घटनेस होर्डिंगधारकास जबाबदार धरत कारवाई होईल. विशेषतः हिंजवडी परिसर, हवेली तालुक्यातील वाघोली, मांजरी, नऱ्हेसह पौड रस्ता, सूस रस्ता, पुणे-सातारा, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-नगर, हडपसर- दिवे घाट, तळेगाव-चाकण-शिक्रापूरह यासह सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग तसेच वर्दळीच्या ठिकाणचे होर्डिंग काढावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे होर्डिंगबाबत अनुचित दुर्घटना घडल्यास होर्डिंगमालक, फलकावर असणाऱ्या जाहिरातदार व जागामालक यांना जबाबदार धरण्यात येईल.
 
पावसाळ्यापूर्वीच्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय यावर्षी प्रथमच 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत होर्डिंगवर जाहिरात न लावता ते रिकामे ठेवावेत, होर्डिंगचे स्ट्रक्चर खराब झाले असल्यास ते तातडीने दुरुस्त करून घ्यावे, असा सूचना होर्डिंगचालक व मालकांना दिल्या आहेत.
-डॉ. प्रदीप ठेंगल (उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग)