महापौर निधीपासून शहरातील गरजू रुग्ण वंचित!

    15-Apr-2025
Total Views |
 
mah
 
पिंपरी, 14 एप्रिल (आ.प्र.) :
 
महापालिकेतील प्रशासकीय राजवटीमुळे शहरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. महापौरपद रिक्त असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टकडून त्या रुग्णांना मिळणारी 5 हजार रुपयांची वैद्यकीय मदत गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. महापालिका अधिकाऱ्यांकडून तोडगा काढला जात नसल्याने रुग्ण मदतीपासून वंचित आहेत. महापालिकेने 4 सप्टेंबर 1991 ला या ट्रस्टची स्थापना केली. औषधोपचारासाठी अर्थसाह्य करणे, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्तीसमयी पीडितांना अर्थसहाय करणे हा मुख्य उद्देश आहे. ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी 5 हजार रुपये मदत केली जाते.
 
धनादेशावर ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून महापौरांची सही असते. ही रक्कम कमी असली, तरी त्यामुळे गरीब रुग्णांना थोडासा आर्थिक दिलासा मिळतो. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या या ट्रस्टचे अध्यक्षपद महापौरांकडे आहे. या ट्रस्टमध्ये उपमहापौर (उपाध्यक्ष), सहआयुक्त (सचिव), मुख्य लेखापाल (खजिनदार), स्थायी समिती सभापती, विधी समिती सभापती, सभागृह नेता, मुख्य लेखापरीक्षक व क्रीडा विभागाचे उपायुक्त (सदस्य) यांचा समावेश आहे. मात्र, प्रशासकीय राजवटीत महापौर नसल्याने ती मदत रुग्णांना मिळू शकत नाही आहे.
 
दरम्यान, महापौरांच्या अध्यक्षतेखाली ट्रस्टचे कामकाज चालते. तत्कालीन महापौर उषा ढोरे यांची मुदत संपल्यापासून शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचे पद रिक्त आहे. गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या ट्रस्टचे कामकाज पूर्णपणे बंद आहे. निधी देण्याबाबत मागणीने धरला जोर महापालिकेचा महापौर निधी देणे बंद आहे. अनेक रुग्ण आर्थिक मदतीअभावी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडे निधीसाठी धाव घेत आहेत. योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे अडचणीत येत आहेत. पैशाअभावी रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून व सामाजिक बांधिलकीतून या निधीचे लेखापरीक्षण पूर्ण करून गरजू रुग्णांसाठी महापौर निधीची पुन्हा सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
 
महिन्याकाठी 20 हून अधिक मागणी अर्ज :
राज्याच्या नगरविकास विभागाच्या 18 डिसेंबर 2007 च्या निर्णयानुसार पालिकेच्या वतीने ट्रस्टला दरवर्षी 25 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. पालिका अर्थसंकल्पात त्या रकमेची तरतूद केली जाते. या निधीतून हदयरोग, कर्करोग, किडनी, मेंदूचे आजार, असे विविध दुर्धर आजाराने ग्रासलेले, अपघातात गंभीर जखमी, नैसर्गिक आपत्तीने पीडित असलेल्या रुग्णांना मदत म्हणून ट्रस्टतर्फे प्रतिरुग्ण 5 हजार रुपये सहाय्य केले जाते. दरमहा किमान 20 रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक मदतीसाठी अर्ज करतात.