पिंपरी, 14 एप्रिल (आ.प्र.) :
पिंपरी ते जिल्हा न्यायालय अशी मेट्रो सुरू होऊन दोन वर्षे होत आली तरी अद्याप खडकी आणि रेंजहिल्स स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. सध्या थेट स्वारगेटपर्यंत मेट्रो धावत असून लाखो नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. मात्र, खडकी, रेंजहिल्स परिसरातील प्रवाशांना नाइलाजास्तव शिवाजीनगरपासून थेट बोपोडी असा प्रवास करावा लागत आहे. नोव्हेंबर 2024 ची मुदत संपूनही स्टेशनचे काम कासवगतीने सुरू आहे. कामाच्या ठिकाणी मजुरांची संख्या कमी असल्यामुळे स्टेशनचे काम पूर्ण होण्यास विलंब होत असल्याची बाब समोर आली आहे. पिंपरी ते जिल्हा न्यायालय या मार्गावर 1 ऑगस्ट 2023 पासून मेट्रो धावत आहे. आता स्वारगेटपर्यंत प्रवाशांना लाभ मिळत आहे. परंतु, दोन वर्षे होत आली तरी अद्याप खडकी आणि रेंजहिल्स स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही.
मेट्रो या दोन स्टेशनवर थांबत नाही. खडकी, खडकी बाजार, औंध, रेंजहिल्स, रेंजहिल्स कॉर्नर, खडकी पोलीस वसाहत, मुळा रोड, राजा बंगला आदी भागातील हजारो नागरिकांना खडकी व रेंजहिल्सऐवजी बोपोडी स्टेशनवरून ये-जा करावी लागत आहे. खडकी भागात मोठी बाजारपेठ आहे. तसेच, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिकत आहेत. ॲम्युनिशन फॅक्टरी, एच.ई. फॅक्टरी, 512 आर्मी बेस वर्कशॉप, सीक्यूएई, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पॅरॉप्लाजिक रिहॅबिलेटेशन सेंटर, लष्कराच्या वेगवेगळ्या अनेक आस्थापना तसेच, रेल्वे पोलीस मुख्यालय, रेल्वे स्टेशन, पुणे विद्यापीठाचे मागील प्रवेशद्वार आणि बराच परिसर या भागात आहे.
या भागातील हजारो नागरिक, कामगार, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी खडकी, तसेच रेंजहिल्स स्टेशन जवळचे आहे. तेथून प्रवास करणे सुलभ आहे. प्रवाशांना थेट शिवाजीनगर किंवा बोपोडी येथून ये-जा करावी लागत आहे. त्यात अधिक अंतर कापावे लागत आहे. तेथून पुन्हा बस किंवा रिक्षाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, अधिक वेळ जात आहे. मेट्रो सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी, अद्याप हे स्टेशन सुरू न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. लष्कराकडून स्टेशनसाठी खडकी येथील जागा खूप उशिरा उपलब्ध झाल्याने काम उशिरा सुरू झाले, असा दावा महामेट्रोकडून केला जात आहे. त्यानंतर काम सुरू होऊन अनेक महिने लोटले आहेत. मात्र, अपुऱ्या संख्येने मजूर नेमल्याने काम संथगतीने सुरू आहे.
परिणामी, काम संपण्यास विलंब होत आहे. हे स्टेशन नोव्हेंबर 2024 मध्ये खुले करण्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली होती. मात्र, त्याला पाच महिने होत आले तरी, अद्याप काम सुरूच आहे. सुशोभीकरण, यांत्रिक जोडणी, रंगरंगोटी, प्रकाश व्यवस्था, जिना आणि इतर कामे अद्याप अपूर्ण आहेत. मुदत संपूनही काम पूर्ण होत नसल्याने संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. रेंजहिल्स स्टेशनचे काम ठप्पच रेंजहिल्स स्टेशनचे काम पूर्णपणे बंद स्थितीत आहे. तेथे कोणतेही काम करण्यात येत नाही. त्यामुळे रेंजहिल्स स्टेशन या प्रकल्पातूनच वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. असे असल्यास रेंजहिल्स, औंध व परिसरातील नागरिकांची फसवणूक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
‘खडकी मेट्रो स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीकडून (सीएमआरएस) चाचणी होणे बाकी आहे. या महिन्याअखेरपर्यंत ती चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते स्टेशन प्रवाशांसाठी खुले केले जाईल. तेथे आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. रेंजहिल्स स्टेशन प्रकल्पातून वगळण्यात आलेले नाही. ते स्टेशनही पूर्ण केले जाणार आहे. तेथे रात्रीच्या वेळेत काम केले जात आहे.'
-श्रावण हर्डीकर, (व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो)