नवी मुंबई, 13 एप्रिल (आ.प्र.) :
नवी मुंबई महापालिकेतर्फे पुरवण्यात येणाऱ्या सेवासुविधा नागरिकांना सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे प्रयत्नशील आहेत. महापालिकेच्या सर्व सेवा डिजिटल करून नागरिकांना महापालिकेशी संबंधित विविध प्रमाणपत्रे, परवाने, नाहरक त प्रमाणपत्रे घरीच उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल सेवाप्रणालीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांचा सात कलमी कृती आराखडा राबवतानाही सेवासुविधांची लोकाभिमुख सुलभता व गतिमानतेवर भर दिला जात असून, विविध कार्यालयांना भेटी देत आयुक्त विद्यमान कार्यप्रणालीत अधिक गतिमान सुधारणेच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलत आहेत. या अनुषंगाने कोपरखैरणे विभाग कार्यालयाला भेट देत आयुक्तांनी कार्यालयीन स्वच्छता व अभिलेखाचे नोंदणीकरण, मांडणी अशा सर्वच बाबींची पाहणी केली. त्यात नागरी सुविधा केंद्रांच्या बाहेरील बैठक व्यवस्थेत वाढ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जन्म-मृत्यू नोंदीविषयक कार्यालयीन दप्तराची पाहणी करताना आयुक्तांनी ही प्रणाली नागरिकांना अधिक सोयीची होण्याच्या दृष्टीने विद्यमान डिजिटल प्रणालीत आवश्यक बदल करण्याचे निर्दे श दिले. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या नोंदणी करता येईल. विवाह नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ करावी. ही प्रणाली पासपोर्ट प्रणालीसारखी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मैदान वापराबाबतच्या परवानगीतही सुधारणा करून सर्व यंत्रणा डिजिटल कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. सर्व प्रमाणपत्र वितरणविषयक बाबींची रजिस्टरमध्ये रितसर नोंद करून ठेवावी, असेही निर्देश सहायक आयुक्त वसंत मुंडावरे यांना दिले.